Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही एक यात्रा काढली जाणार आहे. आज (9 ऑगस्ट) या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा सध्या यात्रांचा मोसम असल्याचे दिसत आहे. यात्रेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे.
राज्यात दोनवेळा मोठे राजकीय भुकंप पहायला मिळाले. आधी शिवसेना हा पक्ष फुटून एका पक्षाचे दोन झाले. तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन पक्ष तयार झाले. एक ‘दादां’चा आणि दुसरा ‘साहेबां’चा. दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुक लढविण्यात आली. यामध्ये लोकसभेत दादांच्या पक्षापेक्षा साहेबांच्या पक्षाला यश मिळाले.
आता अवघ्या काही दिवसांवर राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकिवर फोकस करीत आता जनसन्मान यात्रा काढली आहे. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा 12 जिल्ह्यातील 39 विधानसभांमधून पहिला टप्पा पार पडेल. दिंडोरीनंतर उर्वरित नाशिक, नगर, धुळे जळगाव 16 ऑगस्टनंतर पुणे-मुंबई आणि उर्वरित भागात आणि 31 ऑगस्टला गडचिरोलीत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे.
लोकसभा निवडणूक वेळीं सत्तेत असूनही 53 पैकी 41 आमदार सोबत नेऊनही अजित पवारांना जेमतेम एकच जागा जिंकता आली. त्यामुळे आत्ताची विधानसभा निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी भविष्याची कसोटी असणार आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार यांचीही राष्ट्रवादी मैदानात उतरणार आहे. त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे.
शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीवरून
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू होत आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाची यात्रा पार पडणार आहे. जुन्नरमधील लेण्याद्री येथे पहिली सभा घेण्यात येईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी आणि शेवटची सभा भोसरी विधानसभेत संपन्न होईल. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पोहोचणार आहे.
यात्रेचा फायदा होईल?
लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यात्रेतील बस, चारचाकी वाहने यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यात्रेचे काम पाहणाऱ्या मॅनेजमेंट टीमनेही गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलेले आहेत. त्यामुळे यात रणनीतीत ते किती यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.