वरळीला विकासापासून वंचित ठेवणारे आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. कारण वरळीमुळे फक्त आदित्यचा विकास झाला, वरळीकर मात्र विकासापासून वंचित आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत आव्हान देणारे आज उंदरासारखे वरळीच्या बिळात जाऊन लपले आहेत. लोकसभेत फेक नरेटिव्हच्या माध्यमातून अल्पसंख्यकांची मते मिळवली. मात्र उध्दव ठाकरे गटाने पहिल्या यादीत किती अल्पसंख्यकांना उमेदवारी दिली ते पाहायला हवे. निवडणुकीत वापरा आणि फेकून द्या, असे त्यांचे धोरण आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला ठाकरेंनी नाशिकमधून उमेदवारी दिली, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरणार आहेत. मात्र तिकडे आदित्य ठाकरेंनी पहिला अर्ज भरला.
जनतेत जावं लागतं
स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे कुठून निवडणूक लढवणार आहेत की प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार?असा सवाल त्यांनी केला. लोकांच्या मनातला मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांच्यामध्ये उतरावं लागतं. लोकांशी फेस टू फेस बोलावं लागतं. फेसबुक लाईव्ह करुन कोणी मुख्यमंत्री होत नाही. एक दिवस जनताच तुमच्या तोडांला फेस आणेल, अशी टीका म्हात्रे यांनी केली.
ठाकरे गटाने 146 जागांसाठी भाजपबरोबर युती तोडली. आज त्यांना 85 जाग मिळत आहेत. 1995 मध्ये शिवसेनेला 169 जागा, 1999 मध्ये 161 जागा, 2004 मध्ये 163 जागा, 2009 मध्ये 160 जागा आणि 2014 युती तोडल्याने शिवसेना 286 जागांवर निवडणूक लढली होती. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला 124 जागा मिळाल्या होत्या. आता केवळ 85 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीने उबाठाला खरी जागा दाखवली, अशी टीका म्हात्रे यांनी केली. 85, 85 आणि 85 म्हणजे 270 असे नवे गणित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल सांगितले, असा टोला म्हात्रे यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसचा गेम झाला. सगळ्यात जास्त आमदार असूनही त्यांना केवळ 85 जागा मिळाल्या. दोन मांजरांच्या भांडणात बोका लोण्याचा गोळा मटकावतो. हा बोका कोण आहे हे सगळ्यांना माहित आहेत, असा टोला म्हात्रे यांनी लगावला. लोकसभेत शिवसेनेत ज्यांना तिकिट मिळाली नाहीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर मानाची पदं दिली. शिवसेनेत कुठेही बंडखोरी न होता नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवला.