Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहात आहेत. अकोल्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सम्राट डोंगरदिवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका केली. यावेळी रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी अशी घोषणाबाजी अनिल देशमुख यांनी केली.
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी निवडणुकीची केली जात आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर येथे सोमवारी (ता. 19) राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटक सम्राट डोंगरदिवे यांनी राष्ट्रवादी सुरक्षा कवच, भाऊ येतोय भेटीला , रक्षाबंधनानिमित्त बहिणींसाठी विमा सुरक्षा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे पाच हजार महिलांना पाच लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले. यावेळी आमदार अनिल देशमुख यांनी आपल्या भाषनात महायुतीवर टीकास्त्र डागले.
भाजप चोर आहे
भाजपने आपले जुन चिन्ह चोरले. हे चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना दिले, असा आरोप देशमुख यांनी केला. आपली तुतारी आता घराघरात पोहोचली आहे. राज्यात भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. 50 कोटी रुपये एका आमदाराला देऊन भाजपने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडल्याचे देशमुख म्हणाले. महागाई वाढली आहे. तुरीचर डाळ 100 रुपयांवर गेली आहे. बेसनाचे लाडू कसे कराल, असा सवालही देशमुख यांनी केला. सरकारी भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. महायुती सरकार बेरोजगारांना काम द्यायला तयार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारने कारखाने गुजरातला नेले. महाविकास आघाडही सरकारच्या काळात सगळे स्थिर होते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता. मात्र महायुतीने योग्य भाव दिला नाही. सोयाबीनची परिस्थिती खराब आहे. 15 लाख टन सोयाबीन तेल परदेशातून आणले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या सोयाबीनचेही भाव पडतील. 15 टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केली नाही. ई-पीक विम्याची अट सरकार काढायला तयार नाही. मदत दिली पण अटींमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले. सामान्यांवरील जीएसटी मोठ्या प्रमाणात वाढविली गेली. हेलिकॉप्टर विकत घ्यायचे असेल तर पाच टक्के जीएसटी करण्यात आली. भाजपचे सरकार असे धनदांडग्यांचे आहे, असे देशमुख म्हणाले.
लाडकी बहिण योजना ही निवडणूक आली म्हणून यांना आठवली. निवडणूक आली म्हणून योजना आली. लाडली बहीण ही योजना केवळ खुर्चीसाठी आणली गेली आहे. सरकार यावे यासाठी बहिणींना दीड हजार रुपयांचे आमिष दाखविण्यात येत आहे. या योजनेचा दोन-तीन महिने फायदा घेऊन घ्या. महिलांची फसवणूक करणारी ही योजना आहे. केवळ तीन ते चार महिन्यांची ही योजना आहे. निवडणूक होताच योजना बंद पडेल. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना पाच वर्षांसाठी आणली जाईल. यापेक्षा दुप्पट मदत महिलांना देऊ, असेही देशमुख म्हणाले. सरकार निवडणूक घ्यायला घाबरत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.