काही दिवसांपूर्वी राज्यातील तीन शिक्षणाधिकाऱ्यांकडे कोट्यावधी रुपयांचे धबाड सापडले होते. यामुळे एकूणच शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. शिक्षणाधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी झाली. आणि अखेर तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची गच्छंती झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विविध तक्रारी आणि अनियमिततांसाठी दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कल्पना चव्हाण या चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी (माध्य.) असताना मार्च 2022 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत त्यांनी विविध शालेय प्रकरणांमध्ये अनियमितता केली. अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालक तसेच त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांनाही मानसिक त्रास दिला. त्यात शिक्षक परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
शिक्षकांच्या बदल्या, मुख्याध्यापकांची नियुक्ती, शालेय पोषण आहारातील नोंदी आदी विषयांमध्ये त्यांनी शिक्षकांना वेठीस धरले होते. या संदर्भात त्यांची तक्रार शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध आलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने कल्पना चव्हाण यांची प्रारंभिक चौकशी करण्यात आली. त्यात त्यांच्याकडून अनियमितता झाल्याचे आढळून आले. या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी कल्पना चव्हाण यांची विभागीय चौकशी केली. त्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. तसेच अन्य काही प्रकरणात सुद्धा त्या दोषी आढळून आल्या. त्यामुळे शिक्षणायुक्तांनी चव्हाण यांच्याविरुद्ध शासन स्तरावरून शिस्तभंग कारवाई सुरू केली.
कारवाई सुरू करून त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1959 च्या नियम (4) (1) (अ) अन्वये कल्पना चव्हाण यांना चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातून निलंबित करण्यात आले. यासंदर्भातील आदेश सचिव कार्यालयाने 26 अॉगस्टला जारी केले. चव्हाण यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींमुळे त्यांची जळगाव येथे बदली करण्यात आली होती. राज्य सरकारच्या आदेशांमुळे त्यांना तातडीने पदमुक्त व्हावे लागणार आहे.
आंदोलने अन् पाठपुरावा
चंद्रपूरमध्ये शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध विविध तक्रारी आल्या. त्यांच्या विरोधात शिक्षक परिषद व विविध संघटनांनी आंदोलन केले होते. शिक्षक आमदार नागो गाणार व सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात ही आंदोलने झाली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे कारवाई वेगाने होऊ शकली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.या कारवाईमुळे उशिरा का होईना परंतु, न्याय मिळाला अशी भावना व्यक्त होत आहे.