Lok Sabha Election : दारूडे कधी जिल्हाधिकारी कार्यालयात तर कधी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूम भागात धिंगाणा घालतात. स्ट्राँग रूम परिसरात अशाच एका दारूड्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले.
अनेकवेळा दारुडे विविध भागात धिंगाणा घालतात. पण काल एका दारुड्याने कहरच केला. बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीन ठेवले त्या आयटीआय इमारत परिसरातून जाऊ द्या म्हणून धिंगाणा घातला. या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरण वाढल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली. दारुड्याचा हा धिंगाणा पाहण्यासाठी परिसरात गर्दी जमली होती.
26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा मतदारसंघात मतदान झाले. मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन बुलडाणा शहरातील मलकापूर मार्गावरील आयटीआय मध्ये ठेवण्यात आल्या आहे. या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी आयटीआयच्या संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त आहे. परंतु काल दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी अमोल श्रीराम नाईक, वय 42 वर्षे, राहणार वरुड ता.मेहकर हा आयटीआय कॉलेजच्या गेट समोर दारू पिऊन आला. पोलिसांना म्हणाला, मला नातेवाईकाला भेटायला आत जाऊ द्या. त्याला पोलिसांनी मनाई केली असता आरोपीने सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करून शांतता भंग केली.
Cyber Crime : जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हाट्सअपवर बनावट अकाऊंट वरून फसविण्याचा प्रयत्न!
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा आरोपी दारू पिलेला होता. आरोपीवर दारूबंदी कायद्याप्रमाणे शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी सुशील धांडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
स्ट्रॉंग रूम हे प्रतिबंधित क्षेत्र
बुलढाणा क्षेत्रातील 1962 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सील करून बुलढाणा शहरातील आयटीआयमध्ये ठेवल्या आहेत. या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तत्पूर्वी सदर परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. 100 वर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या परिसरात 24 तास आहे.