Buldhana Constituency : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली. सोबतच काँग्रेस पक्षाला 800 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड आकारण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती. बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह 25 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कलम 188 व 135 नुसार हे गुन्हे दाखल केले आहे. बुलढाणा पोलिसांच्या या कारवाई जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच काँग्रेससाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाध्यक्षांसह अन्य 25 जणांवरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहितेत आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून 29 मार्च रोजी नवी नोटीस बजावण्यात आली आहे. साल 2017 – 2018 आणि 2020-21 या कालावधीतील दंड तसेच त्यावरील व्याज या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने काँग्रेसला 1800 कोटी रुपये रकमेचा दंड ठोठावला आहे. आयकर विभागाच्या नोटीसमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचा निषेध देशभरातून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती.
Lok Sabha Election : आमदार फुंडकरांनी काढली शिंदेंच्या बंडातील हवा !
केंद्रातील भाजप सरकार यंत्रणांचा गैरवापर करून पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहे. पण जाणीवपूर्वक केलेल्या या कारवाया जनतेच्याही लक्षात येत आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कसे नामोहरम केले, याचे किस्से सामान्य जनतेमध्ये चर्चिले जात आहेत. येवढे करूनही भाजपचे समाधान न झाल्याने यंत्रणेचा वापर करून काँग्रेस पक्षाला दंड ठोठावण्यात आला. अशा कितीही कारवाया झाल्या तरी फरक पडणार नाही. आता जनताच या सरकारला धडा शिकवणार आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.