Mahayuti : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील मतदारसंघांमध्ये महायुती 25 जागा जिंकण्याची शक्यता भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये समोर आल्याची माहिती मिळत आहे. विदर्भातील मतदारसंघांत भाजपकडून नुकताच सर्व्हे करण्यात आला आहे.
मोठा फटका
2024 ची लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महायुतीला कमी जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत 45 प्लस चा दावा करणाऱ्या भाजपलाही मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला महायुतीला चांगलं यश निवडणूकीत मिळाले. आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात विविध पक्ष, संघटना निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. महायुतीत आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत.
अशातच विदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्वे केला असल्याचं समोर आलं आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त 25 जागा मिळत असल्याची माहिती आहे. विदर्भात भाजपला 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेतून मांडण्यात आला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा!
अकोल्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व्हेवर भाष्य केले आहे. सर्व्हे जनतेतून झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केवळ मनाचे समाधान करून देणारा सर्व्हे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारला मोठं बहुमत मिळेल, हा दावाही करणे चुकीचे आहे. मी दावा मानत नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Assembly Election : वरुड मोर्शी मतदारसंघात देशमुख विरुद्ध भुयार
सर्व्हे मध्ये नेमकं काय!
सर्व्हेमध्ये नागपूर जिल्ह्यात भाजपाला केवळ चार जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातील 62 पैकी 39 आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाला विदर्भात 2014 मध्ये 62 पैकी 42 व 2019 मध्ये 29 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2019 मध्ये 5 आमदार निवडून आले होते. त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या. तर शिवसेनेकडे 2019 मध्ये 3 जागा होत्या. तर 3 अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला साथ होती. त्यामुळं विदर्भात शिंदे शिवसेनेकडे 6 आमदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत विदर्भातील मतदारसंघात महायुतीला कमी जागा मिळत असल्याचा सर्व्हे समोर आला. त्यामुळे भाजपकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जवळपास काही मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात होत असलेल्या दाव्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सूरू आहे.