भंडारा जिल्हाच्या अड्याळ नगरपंचायतीच्या स्थापनेचे विघ्न अखेर टळले. उशिरा का होईना; पण अड्याळवासीयांनी ग्रामसभेतून स्वीकृती दिल्याने अड्याळ नगरपंचायत बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अड्याळ गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने अधिसूचना काढली होती. त्यावर संमिश्र मत व्यक्त करणाऱ्या गावकऱ्यांनी अखेर सोमवारी (ता. ९) झालेल्या ग्रामसभेतून स्वीकृतीची मोहर उमटविली.
गावच्या विकासाचा मार्ग भविष्यात मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र नेरला गावच्या पुनर्वसनासाठी गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यावर संबंधित शेतकरीच आपला निर्णय घेतील, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या दोन्ही विषयांवरून गावाचे वातावरण काही दिवसांपासून तापलेले होते. मात्र ग्रामसभेतून गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेऊन सामंजस्याने तोडगा काढला.
अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी (ता. 9) दुपारी 4 वाजताच्या सुमारास विशेष ग्रामसभेचे आयोजन गुजरी चौकात केले होते. परंतु सभा सुरू होताच पाऊस सुरू झाल्याने जवळच असलेल्या मुन्ना हॉल येथे ही सभा स्थानांतरित करण्यात आली. सरपंच शिवशंकर मुंघाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गावकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
भविष्यात गावासाठी नगरपंचायत किती महत्त्वाची आहे, याविषयी बऱ्याच ग्रामस्थांनी मते मांडली. गावाला नगर पंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी याच ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी ठराव घेतला होता. आता नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त झाला असताना आक्षेप घेणे चूक असल्याचेही मत सुज्ञ ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मांडले.
लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. नेरला गावच्या पुनर्वसना अड्याळ येथील शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. त्यावर निर्णय संबंधित शेतकरीच घेतील. मात्र या विषयावर प्रशासनाने विषेश बैठक घ्यावी. त्यात सर्व मोबदला तसेच पुनर्वसनाशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट कराव्या, अशी मागणी घेऊन ठराव घेण्यात आला.
आता तालुक्याच्या संघर्षाला मिळणार बळ..
अड्याळ तालुका व्हावा, या मागणीला आता या सर्व घडामोडींनी बळ मिळणार आहे. कित्येक वर्षांपासून अड्याळ तालुक्याच्या मागणीसाठी आंदोलने, निदर्शने झाली, अनेक निवेदने देण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. याव्यतिरिक्त मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या पायपूजाही करून झाल्या. तरी अद्याप अड्याळ तालुका होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला नाही. मात्र आता नगरपंचायतीची मागणी मान्य झाल्याने तालुक्याच्या मागणीलाही बळ मिळाले आहे. भविष्यात लवकर ही मागणी ही मान्य होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.