Gondia : गोंदिया आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्याला एका कामासाठी लाच मागणाऱ्या लेखापालाला एसीबीने अटक केली आहे. कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत महिला कर्मचाऱ्याला प्रोत्साहन भत्त्याची रक्कम काढून देण्यासाठी लाच मागितली होती. लाच मागणारा लेखापाल असून त्याला अडीच हजार रुपयांची लाच स्विकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
गुरुवारी (1 ऑगस्ट) गोरेगाव पंचायत समितीत ही कारवाई करण्यात आली. लाचखोर लेखापालाचे नाव सुरेश रामकिशोर शरणागत (36) असे आहे. तक्रारदार महिला गोरेगाव तालुक्यातील चोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गिधाडी उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला 16 हजार 500 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला होता. ही रक्कम काढून देण्यासाठी लेखापाल सुरेश रामकिशोर शरणागत याने तीन हजारांची लाच मागितली.
शरणागत हा पंचायत समितीच्या आरोग्य विभागात, तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रण पथकात कंत्राटी पदावर आहे. तक्रारदार महिलेला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया कडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागत असल्याची खात्री झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
तडजोड झाली
गुरुवारी (1 ऑगस्ट) तडजोड झाली आणि 2500 रुपयांची लाच ठरली. त्यानंतर त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे, पोलिस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतूल तवाडे, सहाय्यक फौजदार उमाकांत उगले, हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, कैलाश काटकर, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, रोहिणी डांदगे, दीपक बाटबर्वे यांनी केली.
लाचखोरांचा जिल्हा?
गोंदिया जिल्हा लाचखोरांचा जिजिल्हा ठरणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांत लाचलुचपत विभागाने लाचखोरीच्या 25 हून अधिक कारवाया केल्या आहेत. यात वरीष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कारवाया महसूल विभागातील आहेत. ही बाब लक्षात घेता गोंदिया जिल्हा लाचखोरीने पोखरला गेल्याची चर्चा रंगू लागली आहे.