Buldhana News : ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिंदखेडराजाचे लाचखोर तहसीलदार सचिन जयस्वाल याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तहसीलदारासह त्याचा चालक आणि शिपाई यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 12) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रेतीचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तहसीलदार जयस्वाल याने तक्रारदाराला लाच मागितली होती. शिपाई ताठे आणि चालक मंगेश कुलथे यांच्या माध्यमातून लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्याआधी तक्रारीची सत्यता पडताळणी करण्यासाठी एसीबीकडून पडताळणी कारवाई करण्यात आली. तक्रारीची सत्यता समोर आल्यानंतर सापळा रचून लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
प्रशासनात भूकंप
सिंदखेडराजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून रेतीची अवैध वाहतूक जोरात सुरू होती. यासाठी तहसीलदार जयस्वाल यांचे हस्तक वसुलीसाठी कामाला लागले होते. एका रेती व्यावसायिकासंदर्भातील तक्रार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार आधी पथकाने लाच मागितल्याबाबत खात्री केली. यानंतर शुक्रवारी लाचेतील रक्कम देण्यासाठी सापळा रचण्यात आला. यामध्ये तहसीलदार सचिन जयस्वाल याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तहसीलदारासह त्याचा चालक आणि शिपाई यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. एकीकडे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व महिला अधिकारी धडाकेबाज कारवाया करून वाळूतस्करांचा दणके देत असताना सिंदखेडराजाचे लाचखोर तहसीलदार सचिन जयस्वालसांरखे अधिकारी वाळू तस्करांकडूनच लाच घेत असल्याचे उघडकीस आले आहे.