महाराष्ट्र

Akola West : लोकसभेत साथ देणाऱ्यांसोबत दिसले अभय पाटील 

Assembly Election : बाळापूर, अकोला पश्चिम मतदारसंघावर जास्त फोकस 

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या काळात मिळालेल्या सहकार्याची परतफेड काँग्रेसचे नेते अभय पाटील करताना दिसत आहेत. पाटील हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केला. याशिवाय काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण यांनीही त्यांना भरपूर मदत केली. त्यामुळेच डॉ. अभय पाटील यांना भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भरपूर मतं मिळाली. मतविभाजनामुळे पाटील हे पराभूत झालेत. परंतु त्यांनी आपल्या पराभवातूनही भाजपला द्यायचा तो संदेश दिला आहे. 

पाटील यांनी फोकस केला

आपल्याला निवडणुकीच्या काळात मिळालेल्या मदतीची प्रत्येक परतफेड आता डॉ. अभय पाटील करीत आहेत. बाळापूर आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पाटील यांनी फोकस केला आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात अभय पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांना सहकार्य करीत आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीतील दोन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे डॉ. पाटील हे संतुलित प्रमाणात आपलं कर्तव्य पार पाडत आहे.

काही झालं तरी आघाडी 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षाचे उमेदवार मैदानात आहेत. निवडणुकीत साजिद खान किंवा राजेश मिश्रा यापैकी कोणालाही यश मिळाले तर सरते शेवटी ते महाविकास आघाडीचेच यश राहणार आहे. राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शिवसेनेकडून मिश्रा यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी कोणताही दबाव नाही.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड ओढाताण झाली. अगदी एकमेकांच्या तक्रारी करण्यापर्यंत हे प्रकरण दिले. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेकडून राजेश मिश्रा यांना माघार घ्या असे सांगितले जाण्याची शक्यता नाहीच्या बरोबरीत आहे. असे असते तर मिश्रा यांना शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखलच करू दिला नसता.

महाविकास आघाडीमधून दोन उमेदवार निवडणूक लढवीत असल्याने डॉ. अभय पाटील कोणासोबत जाणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. मात्र डॉ. पाटील हे महाविकास आघाडीसाठी काम करताना दिसत आहेत. साजिद खान किंवा राजेश मिश्रा हे दोघेही महाविकास आघाडीचेच आहेत. यापैकी कोणीही जिंकल्यास त्यांचा पाठिंबा आघाडीलाच मिळणार आहे. त्यामुळे अभय पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपलं काम करताना दिसत आहेत.

Assembly Election : ईव्हीएमच्या सुरक्षेत हलगर्जी; तिघे निलंबित

लक्ष केंद्रित

सध्या त्यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या बाळापूर विधानसभा मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. दुसरीकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. अभय पाटील आणि मदन भरगड यांच्यातील वाद रंगला होता. अगदी पिस्तूल बाहेर काढण्यापर्यंत हा वाद गेल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पाटील कोणाला मदत करत असतील, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!