Nagpur : अगोदर जातीपातींच्या अवतीभोवती फिरणाऱ्या निवडणूकीत आता ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा केंद्रस्थानी येऊ लागला आहे. भाजपकडून यावर विशेष भर देण्यात येत असताना विरोधकांकडून त्यावर टीका करायला सुरुवात झाली आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनी नागपुरात येऊन कटेंगे तो बटेंगेवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
हिंगणा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वैशाली नगर, डिगडोह येथे सभा घेत सिंंग यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा समाजाला समोर नेणारी आहे. हिंदू धर्मात ‘बटेंगे तो कटेंगे’चे संस्कार नसून एकतेची आणि माणुसकीच्या अस्मितेची शिकवण असल्याचे प्रतिपादन खा. संजय सिंग यांनी केले.
यावेळी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चे भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आज देशाला एकत्र जोडण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्ष धर्माच्या राजकारणामुळे अनेकांचे जीव गेले. मात्र तरीदेखील भाजपचे नेते धर्माचेच राजकारण करून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला देश ही महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांची भूमी आहे. कमीत कमी याची जाण तरी बटेंगे तो कटेंगे चे नारे देणाऱ्या नेत्यांनी ठेवावी.’
आघाडीला मजबूत करा
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना भाजप सरकारने भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना जागा दाखवित राज्यात महाविकास आघाडीला मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदान करताना महागाई, बेरोजगारी, माता-भगिनींवरील वाढते अत्याचार या सर्व गोष्टींचे एकदा स्मरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मद्य घोटाळ्याचे आरोपी
आपचे खासदार संजय सिंग हे दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळ्याचे आरोपी आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह संजय सिंग यांचाही या प्रकरणात समावेश असल्याचा ठपका आहे. या प्रकरणात संजय सिंग यांना तुरुंगवासही भोगावा लागला. ऑक्टोबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत ते तिहार जेलमध्ये होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते प्रचारासाठी विदर्भ दौऱ्यावर होते.