Sunita Kejriwal Meets Sharad Pawar : लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेले यश लक्षात घेता, आम आदमी पार्टी महाविकास आघाडीशी सूत जुळवत असल्याचे दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अलीकडेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत सुनीता केजरीवाल शरद पवारांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीत सामील होण्याचे आपचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात असल्याने आपची जबाबदारी सुनिता केजरीवाल यांच्याकडे आली आहे. त्या पक्षाच्या प्रमुखपदाची एक प्रकारे जबाबदारी सांभाळत आहेत. शरद पवारांसोबत झालेली भेट महाविकास आघाडीत पुन्हा एक आप पक्षाचे इंजन जुळणार का? अशा चर्चांना उधाण आले आहेत.
अर्धा तास चालली चर्चा
सुनिता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार आणि सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. दूसरी कडे ‘आप’ने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या मुंबईच्या अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी झाली, मात्र ती विधानसभा निवडणुकीसाठी नव्हती. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मुंबईतील 36 जागांवर उमेदवार उभे करणार आहे, असं प्रीती शर्मा यांनी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या वाट्याला येऊ शकणाऱ्या संभाव्य मतदारसंघांतून ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. रविवारी (दि.18 ऑगस्ट) जालना येथे शिवस्वराज्य यात्रा पोहोचली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. कार्यकर्त्यांची मूठ बांधण्याचे काम या यात्रेद्वारे केले जात आहे. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे.