Aap Vs Congress भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूक संपताच महाविकास आघाडीत हेवेदावे सुरू झाले. निवडणुकी दरम्यान काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप आपने केला आहे.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकवटून इंडिया आघाडी उभारली. या आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीला समोर जात आहेत. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात आघाडी धर्मातून काँग्रेसने निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेस पक्षाकडून प्रचार अभियानात आपच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप गोंदिया आपचे जिल्हाध्यक्ष उमेश दमाहे, सचिव त्रिसुन चौधरी व संयोजक शैलेश बैस यांनी केला आहे.
भाजप विरुद्ध संताप
गोंदिया-भंडारा मतदारसंघातच नव्हेतर देशात भाजप विरुद्ध जनतेत संताप दिसून येत आहे. निश्चितपणे एनडीएचा पराभव होणार, असा विश्वासही आपच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शविला आहे. त्याच प्रमाणे केजरीवाल यांच्या अटकेचाही निषेध करण्यात आला. आपची दिल्ली व पंजाब या दोन राज्यात सत्ता आहे. मात्र जनविरोधी धोरण आणि भ्रष्टाचाराला जवळ करून एनडीए (भाजप) आकसापोटी विरोधकांवर कारवाई करीत आहे.
Jalgaon Politics : एकनाथ खडसे आणि महाजनांचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’!
इंडिया आघाडी एनडीएला धडा शिकवेल
खऱ्या अर्थाने या देशात पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जनताच रस्त्यावर उतरू लागली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेतून बेदखल करण्यात येईल.तसेच काँग्रेसची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडेही करण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.