New Idea Of Protest : अकोल्यातील रस्ते, पूल, अंडरपास, नाल्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. यासाठी 23 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. भ्रष्टाचाराला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत वंचित आघाडीकडून ‘महा भ्रष्टाचार शिरोमणी पुरस्कार’ असं अनोखं आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
खट्टामिठा हिंदी चित्रपटाचा उल्लेख
‘खट्टामिठा’ या हिंदी चित्रपटातील (Bollywood Movie) मुख्य व्यक्तिरेखा सचिन टिचकुले (अक्षय कुमार) एका कंत्राटदाराच्या भूमिकेत आहे. इतरांप्रमाणेच टिचकुले यांचेही मोठे माणूस बनण्याचे स्वप्न असते. मात्र तो कोणत्याही कामासाठी गेला, तरी त्याला लाच द्यावी लागते. टिचकुले यांच्याकडे लाच देण्यासाठी पैसे असतात. चित्रपटात भ्रष्टाचारासारख्या गंभीर विषयाला विनोदाच्या माध्यमातून स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खरे तर, हा चित्रपट सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचारावर व्यंग आहे. जिथे खालपासून वरपर्यंत कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय होणे अशक्य आहे. आता याच चित्रपटाच्या नायकाच्या नावाने ‘वंचित’कडून अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. नायकाच्या नावानं ‘भ्रष्टाचार शिरोमणी’ असा प्रतिकात्मक पुरस्काराचे आयोजन ‘वंचित’कडून करण्यात आलं. या अनोख्या आंदोलनाची अकोल्यात चर्चा होती.
अनोखा संताप
अकोल्यातील रस्ते, पूल, नाल्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत वंचित युवा आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर सचिन टिचकुले प्रतिकात्मक पुरस्काराचे वितरण केले. भ्रष्टाचार शिरोमणी पुरस्कार न स्वीकारणाऱ्या हायवे, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयात नेवून पुरस्कार सोपविण्याचा युवा आघाडीने निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वंचित’कडून प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती यांचे मुखवटे धारण करून हा अभिनव आंदोलन पार पडले.
Tumsar Municipal Council : तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांमुळे शीतयुद्ध
भ्रष्टाचाराचा निषेध
सचिन टिचकुले या कंत्राटदाराचे कारनामे असलेल्या खट्टामिठा चित्रपटातील प्रमुख प्रसंग स्क्रीनवर दाखवून भ्रष्टाचाराचा निषेध नोंदविण्यात आला.जिल्ह्यातील आणि शहरातील रस्ते, पूल, नाल्या व अंडरपास यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हा प्रश्न जनतेसमोर मांडण्यात आला. झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने ‘भ्रष्टाचार शिरोमणी सचिन टिचकुले पुरस्कार’चे 23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वितरण केले.
अकोला जिल्ह्यात काम करताना अत्यंत तकलादू, चायनामेड वस्तू वापरण्यात आल्या. हायवे अथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अकोला महानगरपालिका या तिनही विभागांनी सचिन टिचकुले यांचे रेकॉर्ड ब्रेक केल्याचा आरोपही ‘वंचित’ने केला आहे. त्यांच्या या भ्रष्टाचाराची दखल घेत अभिनव आंदोलन करण्यात आले.
यांना पुरस्कार
प्रथम बक्षीस पटकावले नॅशनल हायवे अथॉरिटीला (NHAI) देण्यात आले. द्वितीय बक्षीस सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तर तृतीय बक्षीस अकोला मनपाच्या बांधकाम विभागास देण्यात करण्यात आले. पुरस्कार देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते अनुपस्थित राहिल्याने त्यांचे मुखवटे घालून बक्षीस वितरण करण्यात आले. तीनही विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पाट्या लावून पुरस्कार प्रदान करण्यात आला. लाव रे तो व्हिडीओ म्हणत जिल्हाभरातील रस्ते, अंडरपास यांच्या बांधकामतील निकृष्ट दर्जा, भ्रष्टाचार दाखविण्यात आला. युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा परिषद (Zilla Parishad) अध्यक्ष संगीता अढाऊ आदी ‘वंचित’चे नेते पदाधिकारी उपस्थित होते.