Teacher Danced With The Students : ज्ञान दानाचे पवित्र कार्य करणारा वर्ग म्हणजे शिक्षक. शिक्षक हा विद्यार्थ्यांबरोबर समाजही घडवितो. गुरू विना ज्ञान नाही असं म्हटलं जातं. मात्र याच भावी शिक्षकांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अकोल्यातील शासकीय अध्यापक विद्यालयात शिक्षकी पेशाचे धडे गिरवणारे भावी गुरुजी ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर थिरकताना दिसले. या व्हिडिओमध्ये भावी गुरुजींसह प्राचार्य देखील गाण्यावर थिरकत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून शिक्षक आणि प्राचार्यांवर जोरदार टीका होत आहे.
भावी शिक्षकांचा डान्स
सोशल मीडिया हे असं ठिकाण आहे, जिथं कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेले लोक या माध्यमावरून चांगलेच फेमस झाले आहेत. मात्र याच सोशल मीडियावर ट्रोल होण्याची देखील वेळ येते. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भांडणाचे, तर कधी डान्सचे किंवा कधी प्रॅंकचे. अनेक गाण्यांवर डान्स करून रिल्स बनवले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भावी शिक्षकांनी डान्स केला आहे.
ज्या गाण्यावर या भावी शिक्षकांनी डान्स केला आहे, ते गाणंही शिक्षकांना शोभणारं नाही. ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणं शिक्षकांनी निवडलं आणि त्यामुळेच त्यांच्यावर टीका होत आहे. साहजिकच या भावी शिक्षकांच्या व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक अशा गाण्यावर थिरकताना दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
व्हिडिओ शासकीय अध्यापक विद्यालयातील !
चोली के पिछे क्या है या गाण्यावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अकोल्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील असल्याची माहिती आहे. नुकताच लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी अध्यापक विद्यालयात गणेशाची स्थापना करून गणपतीच्या विसर्जणाच्या वेळी भावी शिक्षक ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर नाचताना दिसले. काहींनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून गाण्याबाबत टीका केली जात आहे.
पोलिसांचाही व्हिडिओ व्हायरल!
नागपुरात 15 ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील होते.