Fatal Attack : सत्ताधारी भाजप पक्षाच्याच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर मुंबईतील कल्याणमध्ये रविवारी (22 डिसेंबर) जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी हेमंत परांजपे यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्या दोघांनी मारायला सुरुवात केली. त्यांनी सहा ते सात वेळा सिमेंटचे ब्लॉक उचलून परांजपे यांच्या अंगावर फेकले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
कल्याण पश्चिममध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनांबद्दल पोलिस प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला. आरोपींना 12 तासांत पकडले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अन्यथा मी जिंवत नसतो..
हेमंत परांजपे यांनी सांगितले की, मी लग्न समारंभामध्ये गेलो होतो. आमच्या ओळखीच्या माणसाने मला घराजवळ सोडले. अचानक दोघेजण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. त्या दोघांनी माझ्या उजव्या बगलेत मारायला सुरुवात केली. दोघ तरुण मुले होती. मी खाली पडलो. त्यांनी सहा ते सात वेळा माझ्यावर सिमेंटचे ब्लॉक मारुन फेकले. ते सगळे फेवर ब्लॉक मी माझ्या पायावर घेतले. जर ते डोक्याला लागले असते तर मी जिवंत नसतो. हे कोणी केले, ते सर्व माझ्याकडे पुराव्यानिशी येणार आहे. मात्र हे सगळे राजकारणामुळे झालेले आहे.
भाजपच्या अंतर्गत वादातुन हल्ला ?
भाजपमधील अंतर्गत धूस-फूस ही या घटनेला कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आमच्या पक्षांतर्गत वादातून हा हल्ला झाला, याचा संशय आहे. फक्त माझ्याच पक्षातला नाहीतर राजकीय हेतूने प्रेरित होऊन झालेली ही घटना आहे, असं म्हणत हेमंत परांजपे यांनी भाजपच्या अंतर्गत वादाने हल्ला झाल्याचा आरोप केला.
माझा पोलिस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार आहे. मला आता अनेक नेत्यांचे फोन येऊन गेलेले आहेत. मी त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या हातात तपास आहे. त्यात काय निष्पन्न होते, ते पाहूया. एक सीसीटीव्ही फुटेज मी दिलेला आहे. अजून चार फुटेज मी देणार असे पोलिसांना सांगितले आहे, असंही हेमंत परांजपे म्हणाले.