BJP On Congress : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी (ता. 2) भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत वडेट्टीवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. भाजपने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर रस्तेबांधणीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघांतर्गत ब्रम्हपुरी-सावळी तालुक्याला जोडणाऱ्या गांगलवाडी-व्याहाड या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप नेते अतुल देशकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या रस्त्याच्या कामात आमदार वडेट्टीवार यांनी मोठा घोटाळा केला आहे. मंजूर निधी स्वत:च्या हितासाठी वापरला आहे, असे आरोप भाजप नेते देशकर यांनी केला. हायवे 353-डी वर असलेल्या गांगलवाडी-आरमोरी टी पॉईंट येथे भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
असे आहे प्रकरण
या भागातील आमदार व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 2017 मध्ये या रस्त्यासाठी 920 कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. सावली तालुक्यातील व्याहाड येथे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. मात्र रस्त्याचे काम सुरू झाले नाही, असा आरोप भाजप नेत्याने केला.
निधी मंजूर, पण काम नाही
त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हळदा येथे आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी या रस्त्यासाठी 300 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतरही रस्त्याचे काम झाले नाही. महाशिवरात्रीनिमित्त एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांना कडाडून विरोध केला होता. दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार यांनी रस्त्यावरील सर्व गावांमध्ये त्यांच्या नावाचे आणि फोटोसह बॅनर लावून 600 कोटी मंजूर झाल्याची घोषणा केली. मात्र रस्त्याचे काम झाले नाही, असा आरोप होत आहे.
निधी कुठे गेला राव?
काही दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी सांगितले होते की, एक हजार कोटी रुपये खर्चून काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2880 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तरीही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. कामे झाली नाहीत तर हजारो कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? असा सवाल आता भाजपने उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार हटाओ
‘वडेट्टीवार हटाओ, ब्रम्हपुरी बचाओ’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महिला मोर्चाच्या मार्गदर्शनात माजी आमदार अतुलभाऊ देशकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, तहसील सरचिटणीस तथा माजी पंचायत सभापती रामलाल दोनाडकर, तहसील अध्यक्ष अरुण शेंडे, विनायक पाकमोडे आदी नेत्यांनी नेतृत्व केले.