Maharashtra Government : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. राज्यभरात सरकारच्या विरोधात जाहीर आंदोलनं करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या वतीने बुधवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
काळया वेशभुषेत
स्थानिक गिरनार चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्राला माल्यार्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. गिरणार चौक, गांधी चौक मार्गे जटपुरा गेट या मार्गाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चात सहभागी झालेले सगळे काळ्या वेशभुषेत होते. तसं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांच्यासह इच्छुक उमेदवारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
आठ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात विशेषतः महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. अजूनही राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते, हे विशेष. परिणामी या घटनेनंतर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली. परंतु विरोधकांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
या मोर्चामध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून इच्छुक उमेदवारांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यामध्ये डॉक्टर विश्वास झाडे, सुधाकर अंभोरे , संदीप गिर्हे, महेश मेंढे, बंडू धोत्रे, सुनीता लोढीया यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांचा सहभाग होता .
काळे कपडे अन् निषेध
शिवप्रेमी चंद्रपूरच्या वतीने आयोजित या मोर्चात प्रत्येक जण काळ्या रंगाच्या वेशभुषेत सहभागी झाला. आयोजकांनी तसं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला लोकांनी प्रतिसादही दिला.
अपेक्षित गर्दी जमविण्यात अपयश
या मोर्चाच्या निमित्ताने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचा काही लोकांचा उद्देश होता. परंतु, या मोर्चाला अपेक्षित अशी गर्दी जमविण्यात अपयश आल्याचे दिसून आले.