महाराष्ट्र

Maharashtra Politics : ‘जो जीता वही सिकंदर’

Power Struggle : महाराष्ट्रातील लक्षात राहणारा 'सत्तासंघर्ष'

या लेखातील मतं लेखकांची आहेत. त्यांच्या मतांशी ‘द लोकहित’ समहत असेलच, असे नाही.

काही व्यक्ती खूप भाग्यवान असतात. कोणतीही गोष्ट त्यांना सहज प्राप्त होते. अशा व्यक्तींची वाट अगदी सरळसोट असते. मार्गात कुठेही अडथळे नसतात. त्यामुळे संघर्ष करण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या सभोवताली दिसणा-या, वेगवेगळ्या क्षेत्रांत वावरणा-या अशा कितीतरी व्यक्ती आपल्याला ठाऊक असतात. असा सुखासीन वारसा काहींना पारंपरिक वात्सल्याने मिळतो. तर काही भाग्यवंतांकडे तो सहज चालत आलेला दिसतो.

काही व्यक्तींना मात्र एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावे लागतात. अनेक अग्निदिव्ये पार पाडावी लागतात. वाटेवरचे काटे तुडवत मार्गक्रमण करावे लागते. राजकारण हे क्षेत्र त्यास अपवाद राहिलेले नाही. या क्षेत्रात पाऊलवाट शोधून ‘मंजिल’ गाठणे सोपे राहिलेले नाही. राजकारणातील कथानक चित्रपटातील कथानकांपेक्षा वरचढ, सनसनीखेज, उत्कंठावर्धक ठरत आहे.

युद्ध जिंकण्याचे लक्ष्य..

महाराष्ट्रातील राजकारणाने आतापर्यंतचे सारे सिध्दांत, स्थित्यंतरांसंदर्भात झालेले विक्रम मोडीत काढले आहेत. नवा आयाम राजकारणात जोडला गेला आहे. सत्तासंघर्ष म्हणजे नेमके काय, याची चुणूक महाराष्ट्रातील राजकारणात बघावयास मिळते. ज्या शक्यतांचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही, अशा शक्यता महाराष्ट्रातील राजकारणात संजीवनी ठरुन सिध्द झाल्या आहेत. बुध्दीबळापेक्षाही नामी डाव येथील राजकारणात खेळण्यात आले. युध्द जिंकणे हेच एकमेव लक्ष्य त्यामागे होते.

राजकारणात जे काही करावयास हवे ते सारे महाराष्ट्रातील राजकारणात करण्यात आले. प्रत्येकाने परिस्थिती हेरुन अचूक डाव टाकले. भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी तर आपल्याजवळ असलेल्या सर्व शस्त्र तसेच अस्त्रांचा वेळ बघून खुबीने वापर केला. वेळ प्रसंगी कुटनीतीचा वापर केला. एखाद्याला धडा शिकवणे आणि त्याला वठणीवर आणणे म्हणजे नेमके काय असते, याचे समर्पक उत्तर दिले.

धगधगते राजकारण..

महाराष्ट्रातील राजकारण 2019 पासून झालेल्या निवडणुकीपासून धगधगतच राहिले. उद्धव ठाकरे यांनी दगा दिला. नवीन मित्र जोडले. मोठ्या साहेबांच्या आशीर्वादाने वेगळ्या धाटणीचे सरकार स्थापन झाले. सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला. अवघ्या अडीच वर्षांसाठी मिळालेले मुख्यमंत्रिपदाचे सुखासन पुढे कोणते तांडव रचेल, याची कल्पना कुणालाही आली नाही.

BJP Meeting : कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी बावनकुळे यांच्या शुभेच्छा 

सुयोग्य नीतीचा वापर..

मुख्यमंत्रिपाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांनी दिलेला दगा ते विसरले नाहीत. त्यांना अद्दल घडविण्याचा विडा त्यांनी उचलला. व्यवस्थित आखणी केली. योग्य नीतिचा वापर करून महाविकास आघाडीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. उध्दव ठाकरे यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पक्षाचा एक बलाढ्य गट खुबीने आपल्याकडे वळवला. केंद्रातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात आपली मोहीम फत्ते केली. सत्ता स्थापनेसाठी

धाडस दाखविणा-या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने मोठेपणा दाखवला. हा सर्व करिश्मा देवेंद्र फडणवीस यांनी चतुराईने करुन दाखवला. आपण कोण आहोत आणि वेळप्रसंगी काय करु शकतो, हे सिध्द करून दाखविले.

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अजित दादा यांनी काकांची साथ सोडून सत्तेची कास धरली. दोन महत्त्वाच्या पक्षांत फूट पडली. खरा पक्ष कोणाचा हे वाद रंगले. न्यायालयात पोहोचले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष खरे ठरले. पक्ष फोडाफोडीनंतर राजकीय वातावरण काहीसे बदलले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. मविआला जनतेचा कौल मिळाला. मविआचे नेते यशाने हुरळून गेले.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाला वचपा महायुतीने विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरून काढला. घवघवीत यश मिळवले. विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुतीने अभ्यासपूर्वक योजना राबविल्या. त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. एका दिमाखदार सोहळ्यात नवीन सरकार सत्तारूढ होणार आहे.

लक्षात राहणारा सत्तासंघर्ष..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष नेहमीसाठी लक्षात राहील असा आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. काहीच अशक्य नाही. जिंकण्याची जिद्द असणा-यांची वाट कोणीच अडवू शकत नाही. हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असेल तर नेमकी कोणती रणनीती वापरावी लागते, याचे उत्तर या निकालाचे दिले आहे.

राजकारण बदलले आहे. ते परिस्थिती हेरुन खेळावे लागते. जमेल तिथे जमेल तसे हातखंडे खुबीने वापरावे लागतात हा धडा त्यातून मिळतो. कारण ‘जो जीता वही सिकंदर’ असतो. महाराष्ट्रातील राजकारणात जिंकण्याचे ध्येय गाठण्यासाठी कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. जशाच तसे उत्तर देण्यासाठी करण्यात आलेला चाणक्य नीतीचा वापर नामी ठरला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!