Meeting : विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिलेले महाभारतातील उदाहरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पक्षाचा कार्यक्रम राबविण्यासाठी अर्जुनाची नजर ठेवावी लागेल असे त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी येथे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी बस तिकीट दरामध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, उच्च शिक्षणासाठी मुलींना महिला मोफत शिक्षण, युवकांना स्टायफंड अशा प्रकारच्या सर्व योजनांची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिली.
आपले विरोधक आपल्याबद्दल काय चुकीचा नेरेटीव्ह पसरवत आहेत, याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. महाभारतात जसा फक्त माशाचा डोळा अर्जुनाला दिसत होता तसेच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे, असे यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत महिलांना सांगितले.
मुख्यमंत्री आपले दूत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले दूत म्हणून काम करत आहेत. आपल्याला विरोधकांसारखं जनतेशी खोटं बोलायचं नाही. शिंदे साहेबांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवायची आहेत, असे त्या महिलांना म्हणाल्या. एखाद्या महिलेला कोणी अपमानित करून बोलत असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊ म्हणून त्या महिलेच्या पाठीशी उभे आहेत, ही भावना त्या महिलेच्या मनात असली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
रक्षाबंधनापूर्वी खात्यात 3000 रुपये
शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सांगता रक्षाबंधन पूर्वी होणार आहे. तोपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. सन्मान यात्रेतील मेळाव्यांतून या योजनेची माहिती दिली जाणार आहे.
विरोधकांची टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून राज्याला दिवाळखोरीत ढकलण्याचे काम होत आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. या योजनेवरून अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आमने-सामने आले आहेत. तर महायुतीने सरकार कुठल्याही योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.