Congress : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच सरकारी यंत्रणा सुद्धा सप्टेंबर महिन्यात आचारसंहितेच्या घोषणेची वाट पाहताना दिसून येत आहे. प्रत्येक पक्षातून उमेदवार ही तयारीला लागलेले आहेत. पण इच्छुकांची वाढती यादी आता सर्वच पक्षातील श्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. आमगाव विधानसभेसाठी इच्छुकांच्या वाढलेल्या याद्या लक्षात घेता पक्षश्रेष्ठींचे टेंशन वाढले आहे.
सध्या आमगाव विधानसभेचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे. आमदार सहेसराम कोरोटे हे काँग्रेसकडून अग्रस्थानी आहेत. परंतु त्यांच्या पंचवार्षिक कार्यकाळावर पक्षश्रेष्ठी व नागरिकांमध्ये नाराजीचे सूर आहेत. मतदारसंघातील जनतेला फक्त एकदाच संधी व दुसऱ्यांदा नवीन चेहरा मान्य असतो व याच अपेक्षेने अनेक नवीन चेहरे समोर येताना दिसून येत आहेत. यात काँग्रेस पक्षाकडून आमदार कोरोटे आपले तिकीट पक्के समजून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीकाठी घेत आहेत. अशातच लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर अनेक उमेदवार तयारीत लागलेले आहेत.
हम साथ साथ है
त्यात माजी शासकीय अधिकारी आर. एल. पुराम अनेक दिवसांपासून संपूर्ण विधानसभेत कार्यक्रम व नागरिकांच्या समस्या सोडविताना दिसत आहेत. कामाच्या भरवशावर उमेदवारी मिळवण्याच्या रांगेत आहेत. दुसरीकडे विद्यमान खासदारांचे चिरंजीव अॅड. दुष्यंत किरसान यांनी एक युवा चेहरा म्हणून वेगळीच फौज निर्माण केली आहे. युवा कार्यकर्त्यांत व खासदार पूत्र म्हणून कमी दिवसातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. भाजपचे माजी आमदार संजय पुराम तर मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच जोमाने कामाला लागले आहेत. त्यात त्यांच्या पत्नी सविता पुराम (महिला बालकल्याण सभापती) या सुद्धा त्यांच्या मदतीला असून, महिला वर्गाच्या व अन्य नागरिकांच्या समस्या सोडवून एक गट तयार करण्यात पतीला सहकार्य करीत आहेत.
मोर्चेबांधणी व नवे चेहरे
दूसरीकडे अर्चना मडावी या प्रत्येक कार्यक्रमास हजर राहात आहेत. मतदारसंघामध्ये आपली बाजू जोरकसपणे मांडताना दिसत आहेत. विधानसभा मतदारसंघातून प्रथमच महिला उमेदवार म्हणून आघाडीवर आहेत. डॉ. श्रीकांत राणा हे दंतचिकित्सक असून; त्यांनी आमगाव तालुक्यात स्वतःची एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच त्यांचे वडील माजी जिल्हा परिषद सदस्य यांचीही साथ त्यांना आहे. पूर्ण विधानसभेत त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरामुळे त्यांना जनमानसात सहानुभूती मिळत आहे. एक नवीन युवा चेहरा म्हणून ही पक्षश्रेष्ठींचे मन जिंकण्यात यशस्वी होऊ शकतात. हनुमंत वटी, शंकर मडावी हे देखील उमेदवारी मागण्याच्या शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर्फे रमेश ताराम देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ही सर्व नवनवीन ईच्छुकांची यादी बघता पक्ष प्रमुख मात्र अडचणीत आले आहे.