Bhandara : भंडारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मात्र, अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइनमध्ये अपात्र दाखवले जाते. अशा महिलांच्या फॉर्ममधील चुका दुरुस्त करण्यासाठी महिलांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक त्रुटीमुळे मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी’ बहीण योजना अडकली असल्याचे बोलले जात आहे.
काही नागरिकांनी स्वतःच्या मोबाइलवरून लाडकी बहीण योजनेचा फार्म मराठीमध्ये ऑनलाइन भरले आहेत. कागदपत्रे स्पष्ट नसल्यामुळे असे फॉर्म ऑनलाइनमध्ये अपात्र दाखवले जात आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दुसऱ्यांदा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तरतूद नसून एडिट ॲप येतो. त्यामध्ये फॉर्म चुकला असेल तर दुरुस्ती करता येते. परंतु, काहींच्या मोबाइलमध्ये एडिट ॲप नाही, त्यांनी काय करावे, हा एक मोठा पेच निर्माण झालेला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही ऑनलाइन त्रुटी आलेल्या आहेत, त्या संबंधित नव्याने फार्म भरण्याची तरतूद करावी. अन्यथा या लाडकी बहीण योजनेपासून कित्येक महिला वंचित राहतील. त्यामुळे शासनाने यावर काहीतरी मार्ग काढून अपात्र असलेले फार्म ऑनलाइन करता येईल यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील महिलांनी केली आहे. याबाबत ‘द लोकहित’ने एकात्मिक बाल विकास अधिकारी, मोहाडी, योगिता परसमोडे यांच्याशी बातचीत केली असता,भंडारा जिल्ह्यात अनेक अर्जांमध्ये त्रुटी आहेत. त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल. दुरुस्तीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळेल. लाभार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता करून द्यावी अशी माहिती दिली आहे.
गोंदिया अव्वल
दूसरीकडे दाखल केलेल्या अर्जापैकी सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 915 बहिणींनी अर्ज केले होते. यापैकी 2 लाख 68 हजार 915 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. याचे लाडक्या बहिणींना मोबाइलवर संदेश देखील प्राप्त झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती आणि योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात जिल्हा अव्वल ठरला आहे.