War Of Post Of MLA : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. विधानसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अभिजित ढेपे हे देखील शर्यतीत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी घमासान सुरू आहे. महायुतीकडून मात्र भाजपाचे आमदार प्रताप अडसड हे एकमेव शिलेदार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा भाजपच्या प्रताप अडसड यांनी पराभव केला होता. निवडणुकीत मतांचा हा फरक 10 हजार होता. या मतदारसंघातील निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच अटीतटीची राहिली आहे. 2024 मधील निवडणुकीसाठी वीरेंद्र जगताप यांनी कंबर कसली. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी त्यांना आव्हान दिले.
शिवसेनेचे आव्हान
अभिजित ढेपे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला. त्यामुळे वीरेंद्र जगताप यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. सध्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात चांगलीच ओढाताण सुरू आहे. ठाकरे गटााला हा मतदारसंघ हवा आहे. या मतदारसंघात आमदारकीचा अनुभव असलेल्या जगताप यांची प्रबळ दावेदारी कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला सुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपचे आमदार प्रताप अडसड यांचेच नाव चर्चेत आहे. त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहे. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा प्रचार सध्या मतदारसंघात सुरू आहे. त्यांचा स्वभावही मनमिळाऊ असल्याची चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे सध्या धामणगावरेल्वे विधानसभा मतदारसंघात ‘एकच वादा, प्रताप दादा’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य वाढले
अभिजीत ढेपे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य वाढले आहे. अभिषेक ढेपे यांची सहकार क्षेत्रात बऱ्यापैकी पकड आहे. मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे शिवसेनेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. ठाकरे गटात सध्या हिच चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मात्र दोन दावेदार नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी होत असलेल्या रस्सीखेचमुळे महाविकास आघाडीत बिघाडी तर निर्माण होणार नाही ना, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.