Fek Aadhar card : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. सरपंचांनीच चक्क बोगस आधार कार्ड तयार केले आणि आपले वय वाढवून वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेतला. हा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड़ झाला आहे. मोहाडी तालुक्याच्या पिंपळगाव (कान्हळगाव) येथील महिला सरपंचाने हा उपद्व्याप केला आहे.
रेखा ज्ञानेश्वर गभने असे या सरपंचांचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात असे किती बोगस लाभार्थी असतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आठ वर्षांपूर्वी रेखा गभने यांनी वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून बनावट आधार कार्ड तयार केले. 375850122727 या क्रमांकाचे दोन आधार कार्ड तयार करून घेतले. एकावर 10 नोव्हेंबर 1975, तर दुसऱ्या आधार कार्डवर 1 जानेवारी 1953 अशा जन्मतारखा मुद्रित आहेत.
खोटी जन्मतारीख
दोनपैकी दुसरे आधार कार्ड वापरून त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. खोट्या जन्मतारखेच्या आधार कार्डनुसार त्यांचे वय 71 वर्षे आहे. प्रत्यक्षात त्यांचे वय 49 वर्षे आहे. मोहाडी तहसीलदारांमार्फत वृद्धापकाळ निर्वाह योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. लाभार्थ्यांकडून वयाचे पुरावे जमा करण्यात आले. त्यात रेखा गभणे यांनी वय वाढवून दिलेले आधार कार्ड तलाठ्यांकडे जमा केले.
दरम्यानच्या काळात उपसरपंच उमेश उपरकर, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, बिरजलाल गभणे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची आणि सरपंचपदावरून अपात्र करण्याची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सरकारची दिशाभूल..
रेखा गभने या ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असताना त्यांनी सरपंचपदासाठी ऑनलाइन नामनिर्देशन दाखल केले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करताना शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर असलेल्या प्रमाणेच ऑनलाइन अर्जातही 10 नोव्हेंबर 1975 ही जन्मतारीख लिहिलेली आहे. त्यांचे माहेर भंडारा तालुक्यातील सिरसी येथील आहे. गावातील शाळेच्या रेकॉर्डवरही 10 नोव्हेंबर 1975 अशीच जन्मतारीख नोंदविलेली आहे.निवडणूक लढण्यासाठी टीसीचा आधार घेतला. वृद्धापकाळ निर्वाह योजनेच्या लाभासाठी बनावट आधार कार्डचा वापर केला. दोन्ही आधार कार्ड बघितल्यावर हे स्पष्टपणे लक्षात येते. त्यांच्या आंधळगाव येथील बँक खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये मानधन जमा झाले असल्याचेही समोर आले आहे.
Suspension : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनावरून माजले रणकंदन !
द लोकहितची दखल
याबाबत ‘द लोकहित’ने ग्रामपंचायत पिंपळगावच्या (कान्हळगाव) सरपंच रेखा गभणे यांचे मत जाणून घेतले असता, मला वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळत आहे. त्यासाठी आधार कार्ड बनविले, हे त्यांनी मान्य केले आहे. मात्र एकटी मीच नाही. तर गावातील अनेकजण तसेच ग्रामपंचायत सदस्यदेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचा गोप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान मोहाडी तहसीलदारांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.