Death cases नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका येथील बेलोना गावात काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली. भाजपच्या नेत्यामुळे या कार्यकर्त्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनगर समाजाचा काँग्रेसचा कार्यकर्ता अरविंद बांबल याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य मुकेश चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून अरविंद बांबल याने आत्महत्या केली. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
काय आहे नेमके प्रकरण?
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका येथील बेलोना गावातील धनगर समाजाचा काँग्रेसचा कार्यकर्ता अरविंद बांबल याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. त्याने येथील ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्याचे अतिक्रमण काढण्यात आले. गेल्या 18 ते 20 वर्षांपासून तो बेलोना गावात राहायचा. या त्रासाला कंटाळून त्याने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे बांधव यांच्यात आक्रोशाची भावना निर्माण झाली.
सदस्य मुकेश चव्हाण यांच्या दबावाखाली ग्रामपंचायतने ही कारवाई केली. अशा पद्धतीने आरोप करण्यात आला. मुकेश चव्हाण हे भाजपचे आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरी पोलिसांनी कारवाई केली नाही. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन एसपी यांना देण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे आपबिती सांगितली तरीही पोलिसांचे डोळे उघडले नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
महायुती म्हणजे भ्रष्टाचार
अनिल देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या आमदारांना 50 कोटी देऊन फोडले. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. भारतीय जनता पक्षाची हीच वृत्ती असल्याचे ते म्हणाले. यांचे फोडाफोडीचे राजकारण चालले आहे. जनता देखील यांच्या राजकारणाला कंटाळले आहे. कर्नाटकमध्ये भाजपने 10 कोटीने भाव वाढवले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दिल्लीतही असेच सुरू आहे
पश्चिम बंगाल, दिल्लीत असेच प्रकरण सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपात अटक करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने राज्यात गलिच्छ राजकारण केले. ज्या राज्यात यांचे सरकार नाही त्या राज्यात ईडी, सीबीआय पोहोचून आपले सरकार प्रस्थापित करत असल्याचा आरोप देखील अनिल देशमुख यांनी केला आहे.
बैठकीत निर्णय
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. सध्या सर्वच महत्त्वाच्या पक्षातील नेते महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. तर पक्षातील काही कार्यकर्ते, आमदार यांच्याकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे. येत्या 27 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.