Buldhana News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणं शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या चांगलेच भोवले आहे. बुलढाण्यातील काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. काँग्रेसने 6 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर बुलढाणा पोलिसात त्या आमदार विरुद्ध कलम 192 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी हा आगाऊपणा आमदार गायकवाडांना चांगलाच भारी पडणार, असं एकंदरीत स्थितीवरून दिसतंय
वक्तव्यामुळे वाद
काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला आहे. त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद राजधानी दिल्लीसह देशभरात उमटत आहे.
सोमवारी (ता. 16) बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी हे स्फोटक विधान केले. राहुल गांधी यांच्या कथीत आरक्षणविरोधी विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली आहे.
राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे. ‘राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देऊ”, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून संजय गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यवर आक्रमक होत बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं.
Sanjay Gaikwad : जीभ छाटायची सोडा, केसाला जरी हात लावला तर 1 कोटी..
गुन्हा दाखल करा
काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, प्रभारी कुणाल चौधरी, प्रदेश सचिव जयश्री शेळके, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, अॅड. जयश्री शेळके, अॅड. संजय राठोड, अरविंद कोलते, विजय अंभोरे, सुनील सपकाळ, अॅड. गणेशसिंग जाधव, स्वाती वाकेकर, अॅड. हरीश रावळ, धनंजय देशमुख, शैलेश खेडकर, अशोक सुरडकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी रात्री ठाण्यात ठाण मांडून होते. आमदार गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. त्यांनतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.