महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : कन्सल्टंट, कंत्राटदाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

Rajendra Patode : वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश महासचिवांची मागणी

Rajkot Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कन्सल्टंट चेतन पाटील आणि कंत्राटदार जयदीप आपटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांविरोधात किरकोळ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात आक्षेप घेतला आहे. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे अशाच कलमांचा समावेश आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी देशद्रोह, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय सेनेच्या अपमानाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तक्रारीत बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतळा उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या रचनेत कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांनी गंजलेले नटबोल्ट वापरले. प्राथमिक तपासानंतर हे पुढे आले आहे. त्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले, हे सिद्ध होते. हे प्रकरण केवळ भ्रष्टाचा, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षेपुरते मर्यादित नाही. जंग चढलेले साहित्य लावले जात होते, तेव्हा बांधकाम विभागाचे अभियंते काय करीत होते, असा सवालही पातोडे यांनी केला.

इतिहासाची साक्ष

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी बांधलेले भुईकोट किल्ले, जलदुर्ग आजही दिमाखात उभे आहेत. त्याच स्वराज्याच्या छत्रपतींचा पुतळा कोसळला. अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानाही हा पुतळा आठ महिनेही तग धरू शकला नाही. पुतळा कोसळण्याला केवळ वारे किंवा जंग लागलेले नटबोल्ट कारणीभूत नाहीत. याच्या मुळाशी भ्रष्ट्राचार हे मूळ कारण आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतूक करण्यासाठी हा पुतळा उभारला गेला होता. हाच दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा गुन्हा नौदल तटरक्षक दलाच्या विरोधातील कट आहे.

Congress : पुतळा कोसळल्यानंतर सरकारविरोधात निदर्शने

पुतळ्याचा हा मुद्दा साधा नाही. हे देशविघातक कृत्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा थेट अवमान आहे. त्यामुळे यामध्ये महापुरुषांच्या अवमान करणारे कलमदेखील वापरले जाणे आवश्यक आहे. तटरक्षक दलाचा अवमान देखील करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणात सुधारित कलमांचा समावेश करण्याची गरज आहे. केवळ कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांच्यावर गुन्हा दाखल करून काही होणार नाही. बांधकामाची तपासणी करणारे, बिल मंजूर करणारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, कर्मचारी यांनादेखील गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!