Assembly Election : निवडणूक कामाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या सहाय्यक शिक्षकाविरोधात सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशांवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयप्रकाश जगरामजी हेडाऊ असं शिक्षकाचं नाव आहे. हेडाऊ सावनेर येथील नगर परिषदेच्या सुभाष प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या कामांना गती देण्यात आली आहे. यात प्राथमिक टप्प्यात वयाच्या 85 वर्षांपेक्षा अधिक मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदानाची सुविधा
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा निवडूणक आयोगानं दिली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांना यासाठी या कामावर नेमण्यात आले होते. निवडणूक आयोगाने सोपलेल्या अधिकृत कर्तव्याचे पालन करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते.
सतत दुर्लक्ष
हेडाऊ यांच्याकडे सावनेर येथील मतदार यादीचा भाग क्रमांक 135 सोपविण्यात आला होता. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणुन त्यांची नेमणूक करण्यात आली होती. या भागाचे तलाठी तथा पर्यवेक्षक यांनी हेडाऊ यांना फॉर्म भरून घेण्यास सांगितले. मात्र हेडाऊ यांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला. आदेश घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर हेडाऊ आणि तलाठी यांच्यात वाद झालेत. असभ्य वर्तणुकीचा प्रकारही घडला. त्यानंतर याप्रकाराची रितसर तक्रार अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तक्रार आल्यानंतर हेडाऊ यांना वारंवार सूचना देण्यात आली. परंतु त्यांनी कर्तव्यात टाळाटाळ केली. याबाबत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी हेडाऊ यांना बोलावून समज दिली. त्यांना खलाटे यांनी काम करण्याची संधी दिली. मात्र त्यानंतरही हेडाऊ यांनी कामाकडे दुर्लक्ष केले.
कारवाईचा इशारा
वारंवार सूचना दिल्यानंतरही हेडाऊ यांनी काम न केल्यानं सावनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रविंद्र होळी यांनी सावनेर पोलिस ठाण्यात रितसर लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर जयप्रकाश जगरामजी हेडाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी त्यांनी दिली आहे. निवडणूक विभागातर्फे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, असे त्यांनी सर्वांना बजावले आहे. निवडणुकीचे काम हा राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय प्रचारात सहभागी होता कामा नये. याबाबत निवडणूक विभागामार्फत स्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत. आपली जबाबदारी टाळण्यासाठी कोणीही आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला.