Akola News : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करीत शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदी साठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या बियाण्यांचा सध्या जोरात काळाबाजार सुरू आहे. मागणी असलेले बियाणे जादा दरात विक्री होत आहहे. तसा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे याकडे कृषी विभाग लक्ष देईल का ? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. असे चित्र दाखवायचे, दुसरीकडे किमतीपेक्षा जादा पैसे दिल्यास बियाणे द्यायचे. पैसे देताच बियाणे सहज मिळत असल्याचा प्रकार होताना दिसत आहे. खरेच बियाण्यांचा तुटवडा असेल किंवा नसेल तर कृषी विभागाने खरी परिस्थिती शेतकऱ्यांपर्यंत नेणे गरजेचे आहे.
खरीप हंगामातील शेतीच्या कामांना सध्या वेग आला आहे. शेतकरी अंतिम मशागत करून सध्या बी- बियाणे खरेदी करीत आहेत. त्यासाठी ते आर्थिक जुळवाजुळव करताना दिसत आहेत. त्याला चिंता आहे ती यावर्षीच्या खरीप हंगामाची. हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी सध्या कृषी केंद्रावर बी- बियाणे, खते खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावर्षी जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. पसंतीचे बियाणे मिळावे यासाठी शेतकरी सकाळपासूनच जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर गर्दी करीत आहे. एकीकडे उन्हाचा पारा तापत आहे. दुसरीकडे भर उन्हात तहान-भूक विसरून कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. पसंतीचे कपाशी बियाणे मिळावे या आशेने होत असलेली गर्दी कृषी विभागाला दिसत नाही का? असा सवाल विचारला जात आहे. काही ठिकाणी बियाण्यांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे.
जादा पैशांची मागणी
शेतकऱ्यांकडून जास्त मागणी असलेले विशिष्ट कंपनीचे बियाणे सहज उपलब्ध होत नाही. जादा पैसे दिल्यास शेतकऱ्यांना सहज बियाणे मिळत आहे. जादा पैसे द्यायचे नसल्यास गर्दी रांगेत लागून बियाणे मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. खरेच बियाण्यांचा तुटवडा असेल तर जादा दर दिल्यास बियाणे सहज का मिळते असा सवाल शेतकरी विचारत आहेत. बियाण्यांची जिल्ह्याला मोठी गरज आहे. किती बियाणे उपलब्ध आहे. किती बियाणे आणखी बाजारात येऊ शकते. मागणी आणि पुरवठा आदी माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरविण्याची गरज आहे. मात्र बियाण्यांसाठी धडपड करणारा शेतकरी सध्या यापासून अनभिज्ञ आहे. त्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषि विभागाने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.
काळाबाजार दुर्लक्षित
कृषि विभागाने आता बियाण्यांचा काळाबाजार जिथे होत असेल तिथे कारवाई करण्याची गरज आहे. एकीकडे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहूनही पसंतीचे बियाणे मिळत नाही. मात्र दुसरीकडे काळ्या बाजारात हे बियाणे कसे काय मुबलक प्रमाणात मिळतात. असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे याची चौकशी करून कपाशी बियाण्यांचा काळाबाजार थांबावा आणि सत्य काय ते शेतकऱ्यांसमोर आणावे, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.