Mumbai Incidence : डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला. नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला? ही माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. यात 40 जण जखमी आणि तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत, स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसराला भेट दिली. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पीडितांना आठवडाभरात नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
फडणवीस यांनी व्यक्त केले दु:ख
डोबिंवलीतील दुर्घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या आगीत 8 जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही घटनास्थळी पोहोचतील. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
प्रत्यक्षदर्शीची माहिती
माझे ऑफिस या ठिकाणी बाजूला आहे. यावेळी मोठा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर येऊन पाहिले. त्यावेळी तिथे खूप मोठा स्फोट झाल्याचे समजलं. आता आजूबाजूच्या कंपनीत ही आग पसरत चालली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत”, अशी माहिती स्वप्नील कोरपे या प्रत्यक्षदर्शीने दिली.
यापूर्वीही स्फोट झाला होता
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात यापूर्वीही असाच भीषण स्फोट झाला होता. यात घराच्या काचाही फुटल्या होत्या. हा स्फोटही तसाच आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपन्यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसावी, त्यामुळे हे स्फोट होत असावेत. हा सर्व प्रकार भयावह आहे. यावर योग्य ती काळजी घेतली जात नाही. आग विझवण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर यांनी दिली.