जयेश गावंडे
BJP News : निवडणुकीत यश मिळवणे सोपे नाही. पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढावे लागतात. आणि एखाद्या राज्याची जबाबदारी असल्यास विचारू नका. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकी शतकी खेळी खेळावी लागली. राज्यात 115 सभा त्यांनी घेतल्या. त्यांच्या प्रचाराचा झंझावात भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळवून देईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.
केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार तिसऱ्यांदा यावं यासाठी लोकसभा निवडणुकीत फडणवीसांनी जोरदार प्रचार केला. भाजप सोबत शिंदे शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांना बळ देण्याचे काम फडणवीस यांनी केले. भाजपच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असेल यात शंका नाही. मात्र, निकालानंतरच हे स्पष्ट होणार आहे.
राज्यात 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. लागलीच सर्वच पक्ष, आघाड्या कामाला लागल्या. आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे होऊ लागले. याच निवडणुकीत पक्षाची संपूर्ण जबाबदारी अंगावर घेत. पहिली सभा ते शेवटची सभा असे सलग एकूण 52 दिवस प्रचारसभा सुरू होत्या. एकूण 115 सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि 18 मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला. तेव्हा भिवंडीत त्यांनी 115 व्या सभेला संबोधित केले होते.
विविध मुद्यावर भर
राज्यातील सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली स्थानिक विकासाची कामे, हिंदुत्त्व अशा विषयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षातील विकासकामांची यादी, जगभरात देशाची उंचावलेली प्रतिमा, पाकिस्तानविरुद्ध घेतलेले निर्णय, श्रीराम मंदिर, कलम 370 याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सभेची सुरुवात वर्धा येथून केली. आणि राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भिवंडीत त्यांनी शेवटची सभा घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांची सांगता केली असली तरी, यापुढे देवेंद्र फडणवीस हे लवकरच उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत एंट्री घेऊ शकतात.
भाजपकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष!
राज्यात दोन पक्षांच्या फुटीनंतर भाजपला अपेक्षित यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. कारण एकीकडे अगोदर सोबत असलेली शिवसेना ही महाविकास आघाडी सोबत गेली. त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडून दोन पक्षात शिवसेना विभागली गेली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर आरोप करण्यात आले. हे संपत नाही तेच राष्ट्रवादीतही उभी फूट पडली अजित पवार हे शरद पवार यांना सोडून भाजपसोबत गेले. त्यामुळे हाही पक्ष दोन गटात विभागाला गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळेल याची चर्चा राज्यात होऊ लागली.
P. N. Patil : तरूण ते ज्येष्ठ सर्वांसोबत होता पी. एन. पाटलांचा सलोखा !
त्यामुळे राज्यात मिशन 45 निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपने ही निवडणुक सहजतेने घेतली नाही. त्यामुळेच महायुतीच्या माध्यमातून राज्यभर भाजपने लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. प्रचार सभा, रोड शो, टीव्ही वर मुलाखती, केंद्रातील जवळपास सर्वच नेते राज्यात ठाण मांडून होते. राज्यातील 48 च्या 48 जागांवर भाजपने सर्व लक्ष केंद्रित केले होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची भर पडली. 52 दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रचार सभांचा धडाका कायम ठेवला.
52 दिवसात 115 सभा
या 52 दिवसांत 115 सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण 67 मुलाखती दिल्या. यात 35 मुलाखती या मुद्रीत माध्यमांना, 22 मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर 8 मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या. 2 मुलाखती या राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या.
राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळेल का?
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. राज्यात भाजपने मिशन 45 जागांचा चा दावा केला आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळेल का ? यावरून दावे – प्रतिदावे केले जात आहेत. आकड्यांची बेरीजही केली जात आहे. 48 मतदारसंघाचा नेमका कौल काय असेल याबाबत अंदाज बांधले जात आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभा निवडणुकीतील झंझावात किती प्रमाणात भाजपला यश देईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.