Pune Hit And Run : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला फायदा मिळवून देण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होते, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली, तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी. सोबतच पुणे पोलिसांचीदेखील चौकशी व्हावी, असे आपल्या ट्विटमध्ये (X) वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हीट अॅंड रन प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवाल याला काही तासांतच जामीन मिळाल्याबद्दलही त्यांनी चीड व्यक्त केली.
वडेट्टीबारांचा प्रश्न उपस्थित
पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान न्यायालयाने आरोपी अग्रवाल पिता-पुत्रांना २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. कारण आर.के. अग्रवाल यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही यांचा काय होता, हे तपासायचे असल्यामुळे पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने सध्या तीन दिवस कोठडी मंजूर केली आहे.
वेदांतवर प्रौढ समजून कारवाई होणार का?
आरोपी वेदांतचे वडील फरार झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. पण विशाल अग्रवाल यांच्या वकीलांनी हा आरोप युक्तीवाद करताना फेटाळून लावला. वेदांत अग्रवाल याच्यावर प्रौढ समजून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात बालहक्क न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. वेदांतवर प्रौढ समजून कारवाई होणार का, हेसुद्धा लवकरच कळणार आहे.