‘ब्लॅक डायमंड सिटी’ म्हणून ओळख असलेल्या वणी शहरात सहकार चळवळीने भरारी घेतली. मात्र वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था विविध आरोपांनी अडचणीत आली आहे. विहित पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनंतर सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (3) (क) अनव्ये चाचणी लेखपरिक्षण करण्याची नामुष्की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचेवर ओढवली आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेच्या पावलावर रंगनाथ पतसंस्थेची वाटचाल सुरू झाल्याचा भास होतो आहे. ‘रंगनाथ’वर प्रशासक तर बसणार नाही ना, अशी चर्चा सभासद, ठेवीदारात होताना दिसत आहे. यवतमाळ जिल्यात ‘विना सहकार नाही उद्धार’ या तत्वावर सण 1904 मध्ये सहकार चळवळ सुरू झाली. या चळवळीची व्याप्ती वणी शहरातही मोठ्या प्रमाणात वाढली.
सर्वसामान्य सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन करत अनेक सहकारी पतसंस्था उदयास आल्या. आकर्षक योजनांच्या नावावर सभासद, ठेवीदारांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी शहरातील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत गुंतवल्या. यामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहोचली. मात्र संचालकांची सुप्त ‘मनीषा’ कोट्यवधीच्या बोगस कर्ज वाटपातून उजागर होताना दिसत आहे.
रंगनाथ स्वामी पतसंस्था
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत 17 संचालक कार्यरत आहे. मात्र संस्थेत आर्थिक अनागोंदी माजल्याचे सातत्याने होत असलेल्या तक्रारींतून स्पष्ट होत आहे. अशात काही संचालक कोट्यवधी रुपयांच्या कर्ज वाटपाच्या ठरावाशी आमचा संबंध नाही. असे खासगीत बोलत आहेत. संशयाच्या घेऱ्यात असलेले संस्थेचे वयक्तिक खाते क्रमांक 15995 हे आजी की माजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँक डबघाईस आली. आरबीआयने बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध घातले. त्यावेळी बँकेवर अवसायक म्हणून तत्कालीन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कोट्यवधी रुपयांच्या तारण मालमत्तेला कर्जमुक्त करण्यासाठी खोटा दस्त तयार केल्याच्या आरोपानंतर जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Porshe Hit and Run : दोघांना चिरडल्यानंतर सहजासहजी जामिन कसा मिळाला ?
श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. 70 कोटीचे बोगस कर्जवाटप प्रकरणावर खमंग चर्चा सुरू झाली आहे. संस्थेने अनोळखी व्यक्तीच्या, श्री. विजय चोरडीया यांच्या दुकानात काम करणारे मजूर, मित्र परिवार, नातेवाईक यांच्या नावाने प्रत्येकी 1 कोटी रुपये याप्रमाणे 70 कोटीचे कर्ज वाटप केल्याची माहिती 10 एप्रिल 2024 रोजी जनमाहिती अधिकारी सहकारी संस्था, मुख्यालय यांनी माहिती अधिकार अर्जान्वये तक्रारकर्त्याला दिल्याने खळबळ उडाली आहे. चाचणी लेखापरिक्षण अहवालानंतर सत्य काय ते उजेडात येणार आहे.
सहकार विभागाची भूमिका संशयास्पद !
राज्यात सव्वाशे वर्षांमध्ये सभासदांच्या भागभांडवलावर असंख्य सहकारी संस्था उदयास आल्या. हे खरे असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील काही स्थापित सहकारी संस्थांमध्ये आर्थिक अनागोंदी असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. सभासद जागृत नसल्याने अनेक संस्थांचे घोटाळे चव्हाट्यावर येत नाही. सहकार खात्याने जिल्ह्यातील पाच सहकारी संस्थांची सहकार अधिनियम 88 नुसार चौकशी सुरू केली आहे. मात्र ही चौकशी कुठपर्यंत पोहचली, हा संशोधनाचा विषय झाला आहे. यामुळे रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे चाचणी लेखापरिक्षण पारदर्शक होणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.