Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार मालकांच्या संघटनेने विरोध केला आहे. या विरोधात संघटनेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुंबई शहर आणि उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांना आव्हान दिले आहे.
मेसर्स इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड. विणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्या मार्फत दोन स्वंतत्र याचिका केल्या आहेत. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने सूचना दिल्या
अॅड. विशाल थडानी म्हणाले, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा निर्णय निवडणूक आयोगाच्या सूचनेवर आधारित असल्याने ते याबाबत काहीही करू शकत नाहीत. मतदानाच्या 48 तास आधी मद्यविक्री होणार नाही आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे पाळला जाईल, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.
असोसिएशनने न्यायालयात काय सांगितले?
असोसिएशनने म्हटले आहे की, त्याचे सदस्य राज्य सरकारला व्यवसाय चालविण्यासाठी परवाना शुल्क म्हणून मोठी रक्कम देतात. तर अनेक अवैध दारू उत्पादक आणि बुटलेगर आहेत. जे मुंबईत अवैध दारू तसेच भारतीय बनावटीची विदेशी दारू, बिअर तयार करतात आणि विक्री करतात. त्यामुळे जेव्हा-जेव्हा दारू विक्रीसाठी अधिकृत दुकाने विविध कारणांमुळे बंद होतात, तेव्हा असे अवैध धंदे फोफावतात आणि त्याचा फायदा बुटलेगर्स घेतात आणि अवैध विक्रीतून मोठा नफा कमावतात.
थडानी यांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात दुरुस्ती करण्याची विनंती केली. आणि संपूर्ण दिवसाऐवजी निकाल जाहीर झाल्यानंतर दारूची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे सांगितले. काही वेळ थडानी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने वकिलांना 22 मे रोजी बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्याकडे लक्ष राहील.