RPI : देशात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरू आहे. महायुतीकडून 400 पारचा नारा देण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीकडून सत्तेत येण्याचा दावा केल्या जात असताना रिपाई आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुढच्या मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत.
त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा मिळाली नाही. मात्र, आपल्याला राज्यसभेत संधी मिळणारच आहे आणि यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.
देशात अजून सत्ता स्थपनेला बराच वेळ आहे. मात्र,भाजप समर्थक मित्र पक्षांना सत्ता बदलाची घाई दिसते. अजून सरकार बदलाचा पत्ता नाही. परंतु यांनी आपल्या मागण्या पुढे करायला सुरूवात केली आहे. रिपाईचे नेते रामदार आठवलेही गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे दिसून आले. कारण नव्या सरकारमध्ये आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी थेट मागणीच रामदास आठवलेंनी भाजपकडे केली आहे, असे त्यांनी नाशिक येथे स्पष्ट केले.
महायुतीच्या प्रचारासाठी रामदास आठवले शनिवारी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणूकीसाठी रिपाईला दोन जागा हव्या होत्या. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती. मात्र, दोन्ही जागा नाकारल्या.
एनडीए 400 पार
देशात एनडीएला अनुकूल वातावरण असून, 400 जागा मिळतील. महाराष्ट्रात काहीही झाले तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथे प्रथमच भाजपला अधिक जागा मिळतील, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.