Cause Of Cancer : मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड अधिक प्रमाणात असण्याचे कारण देत सिंगापूर आणि हाँगकाँगने नुकतीच एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी घातली. आता नेपाळनेही एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांची विक्री, वापर आणि आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातीतील आजोबांचे सच.. सच नेपाळने झूठ ठरवलेले दिसते. या कंपन्यांना भारतीय व्यापार मंत्रालयाचा आधार मिळेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मसाल्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड असण्याच्या भीतीपोटी नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नेपाळ मधील भाजीत एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांना स्थान राहणार नाही. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी या मसाल्यांमध्ये घातक रसायने असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले आहे.
बंदीमुळे मसाला व्यवसायात 5 टक्के घट
मसाले दीर्घकाळ टिकावेत यासाठी स्टरलायझेशन प्रक्रिया करून मसाल्यांत एथिलिन ऑक्साइड (ईटीओ) मिसळले जाते. एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांत ईटीओचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतीय मसाल्यांबाबत जगभरात प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. या दोन ब्रँडमुळे भारतातील सर्वच मसाला निर्यातदार कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे भारताची मसाला निर्यात 5 % घटली आहे.
ब्रिटन, न्यूझीलंड सरकार ठेवणार करडी नजर
दरम्यान, एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांची तपासणी ब्रिटन, न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही होऊ शकते. ब्रिटनच्या अन्न सुरक्षा एजन्सीने म्हटले की, ते भारतातून येणाऱ्या सर्व मसाल्यांच्या विषारी कीटकनाशकांची चाचणी कडक करत आहे. ज्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचाही समावेश आहे. न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा नियामक विभागाचे कार्यवाहक उपमहासंचालक जेनी बिशप यांनी सांगितले की, इथिलीन ऑक्साईड हे रसायन आहे. ज्यामुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले देखील न्यूझीलंडच्या बाजारात विकले जातात.त्यामुळे तपासणी करणे गरजेचे असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
भारतीय मसाले निर्यात बोर्डाने पुढाकार घ्यावा
भारताचे मसाले 170 देशांत निर्यात होतात.भारतातून दरवर्षी चार अब्ज डॉलरचे मसाले निर्यात होतात. मसाले सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच देशांत ईटीओचा वापर केला जातो. मात्र त्याचे प्रमाण भिन्न असते. ईटीओ हे मानवी प्रकृतीसाठी हानिकारक नाही. मुळात ईटीओ हे कीटकनाशक नाही. भारतीय मसाले निर्यात बोर्डाने यावर काही तरी पावले उचलायला हवीत असे मत फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर्स’चे चेअरमन अश्विन नायक यांनी व्यक्त केले आहे.