Political War : मी लहानपणी महर्षी वाल्मिकी यांचे रामायण वाचले आहे. त्यामध्ये महत्वाचा भाग आहे, तो माता सितेचे हरण. रावण नाशीकच्या पंचवटीमध्ये मायावी रुप घेऊन आला आणि माता सितेचे हरण केले. अगदी त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात काही लोक मायावी विचार घेऊन लोकशाहीचे हरण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असे राज्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आज (ता. १६) पालघरच्या सातपाडी येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, मी लहान असताना नगरपरिषदेच्या शाळेत ‘डोलकर.. डोलकर… दरीयाचा राजा..’ हे गाणे ऐकले होते . तेव्हापासून हा राजा दरियाशी लढणारा आहे, हे मला माहिती आहे. हा माझा राजा लढणारा आहे. मच्छीमार बांधवांना ५३९.७१ कोटीचा डिझल परतावा आमच्या सरकारने दिला. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात शक्य झाले. यापुढे डिझल परताव्यासाठी मच्छीमार बांधवांना खेटे घालावे लागणार नाही, असा कायदा करण्यासाठी आमचे सरकार पुढाकार घेणार आहे.
मच्छीमार बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही
येथे मत्स्य बाजाराला मंजुरी दिली आहे. सातपाडीचा मत्स्य बाजार होणारच आहे. पैसे जर कमी पडले, तर ते वाढवण्यासाठी डाॅ. हेमंत विष्णू सावरा आणि मी स्वतः तुमच्यासोबत उभे राहू. आमचं सरकार मच्छीमारांचे नुकसान होईल, अशी कृती कदापि करणार नाही.महाराष्ट्राचा ‘म’, मच्छीमारांचा ‘म’ आणि मुनगंटीवारांचा ‘म’ एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. मच्छीमार बांधवांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
उद्धव ठाकरेंची किव
मला तर उद्धव ठाकरेंची किव येते. महाशिवआघाडीची केव्हा महाविकास आघाडी झाली, हे कळलंही नाही. जे आयुष्यभर पंजाचा विरोध करायचे. ते सांगायचे की, भाग्यरेषा तुटलेला हा ‘पंजा’ काही कामाचा नाही. आज त्या नेत्याला काय झालं, हे कळत नाही. पण त्याला आज पंजाचा प्रचार करावा लागत आहे. ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना मोठी केली, त्यांना तुमच्या विरोधात लढून धनुष्यबाण घ्यावा लागत आहे. हा उद्धवजींचा विजय नसून पराभव आहे. मागचे पाच वर्ष ते आमच्या सोबत होते आणि नंतरच्या निवडणुकीतही सोबत होते. पण काय मोह झाला माहिती नाही. पण या मोहात त्यांनी युती तोडली. जनतेने १६१ जागा निवडून दिल्या होत्या. पण जनतेचा अवमान केला. त्यामुळे आता जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले.