महाराष्ट्र

Kunal Raut : कुणाल राऊतांच्या विरोधात असंतोष उफाळला, कारवाई होणार ?

NSUI Nagpur : ‘एनएसयूआय'मध्ये लुडबुड, पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी

युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली तेव्हापासूनच कुणाल राऊत वादाच्या भोवऱ्यात सापडत आलेले आहेत. अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी युवकांसाठी काहीही केले नसल्याच्या मुख्य आरोप आहे. आता तर ते आपली संघटना सोडून एनएसयूआयमध्येही लुडबुड करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांना राऊतांची तक्रार वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे.

कुणाल राऊत यांच्या विरोधातील असंतोष आता खालपर्यंत झिरपत चालला आहे. अलीकडेच प्रदेशाध्यक्षांच्या सांगण्यावरून विदर्भातील युवक काँग्रेसच्या 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पूर्व विदर्भातील लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे, हे ठाऊक असतानाही नेमून दिलेले पक्षकार्य केले नाही असा ठपका ठेवून नोटीस पाठवण्यात आल्या. ही पक्षांतर्गत बाब माध्यमांकडे उघड करून युवक काँग्रेसची बदनामी राऊत करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

प्रदेशाध्यक्ष निष्क्रिय आहेत. त्यांनी एकही कार्यक्रम घेतला नाही. असे असताना त्यांना का नोटीस पाठवण्यात आली नाही, अशी विचारणाही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या विरोधात विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. ही घटना ताजी असताना राऊत यांनी एनएसयूआयच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. राऊत कार्यक्रमाला येत असल्याचे कळताच प्रदेश, शहर तसेच विधानसभा पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष आमीर शेख यांनीसुद्धा राऊत यांच्यामुळे कार्यक्रमाला येणे टाळले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला स्वतःची युवक काँग्रेस संघटना सुरळीत चालविता येत नाही, ते काय विद्यार्थी काँग्रेसला मार्गदर्शन करणार, अशी भावना व्यक्त करून विद्यार्थी काँग्रेसने नाराजी दर्शवली आहे. राऊत प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून एकही मोठा कार्यक्रम युवक काँग्रेसच्यावतीने घेण्यात आला नाही.

Statutory Development Board : वैधानिक विकास मंडळांना विरोध कुणाचा?

आपली निष्क्रियता दडवून ठेवण्यासाठी ते एनएसयूआयसारख्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचा आरोप आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवतानासुद्धा त्यांनी भेदभाव केला. संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवू नये, असा सल्ला त्यांना दिला होता. याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पक्षसंघटनेच्या शिष्टाचाराचे पालन केले नाही.

काही निवडक लोकांना हाताशी धरून युवक काँग्रेस तसेच विद्यार्थी काँग्रेसमध्ये लुडबूड करणे सुरू केले आहे. त्यांच्या लुडबुडीची दोन्ही संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठांनी संयम बाळगण्याचा सल्ला देऊन कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे समजते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!