23 सप्टेंबर 2023 ला अतिवृष्टीमुळे पावसामुळे नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानंतर शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाकडून उपाय केले जात आहेत. त्यात उच्च न्यायालयाने फटकार लगावल्यानंतर या कामाची गती वाढली. पण गती वाढवण्याच्या नादात महावितरणची वीजवाहिनी तुटली अन् ऐन उन्हाळ्यात त्याचा मोठा फटका बसला.आधीच ऊन आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना अंबाझरी स्मारक परिसरातील तोडकामाचा मोठा फटका बसला.
भूमिगत वीज वाहिनी क्षतिग्रस्त झाल्याने बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणने त्वरित पर्यायी केबलच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत केल्याने नागरिक उकाड्यापासून बचावले.
पूल तोडणे सुरू
शनिवारपासून सांडव्यालगतचा पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यात पहिल्याच दिवशी भूमिगत मुख्य वीजवाहिनी क्षतिग्रस्त झाली. तलाव परिसरात आवश्यक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांची उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून विविध उपाययोजनात्मक कामे केली जाणार आहे. त्याअंतर्गत सांडव्यासमोरील पूल तोडून उंच करण्यासह या भागातील नाग नदीचे रुंदीकरण केले जाणार आहे.
दोन टप्यांत हे काम पूर्ण करायचे असून 3 महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) संयुक्त विद्यमाने काम केले जाणार आहे. पीडब्ल्यूडीच्या नागपूर ग्रामीण उपविभागाकडून पुलाचे काम मे. एस.जी. मोटवानी कंपनीला दिले गेले आहे. शनिवारपासून पुलाची एक बाजू पाडण्याचे काम सुरू झाले. खोदकामादरम्यान मुख्य वाहिनी तुटली.
हिंगणा-शंकरनगर ३३ केव्हीची वीज वाहिनी क्षतिग्रस्त झाली. या मुख्य वाहिनीवरून एकूण ६ वाहिन्यांद्वारे शंकरनगर आणि अमरावती रोड उपकेंद्रांना वीजपुरवठा होतो. त्यातील ४ वाहिन्या त्रिमुर्तीनगर तर २ वाहिन्या अमरावती रोड उपकेंद्रांना जोडणाऱ्या आहेत. यासोबतच १३२ केव्ही हिंगणा-लेंड्रापार्क वाहिनीही क्षतिग्रस्त झाली.
पीडब्ल्यूडीकडून काम हाती घेताना महावितरणला सूचना केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वीज वाहिनी तुटल्याने मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ही घटना घडल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तातडीने पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता गिरी यांच्यासोबत फोनवर बोलणी करून काम थांबविण्याची सूचना दिली गेली. त्याचवेळी धावपळ करीत प्रभावित भागांत पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, जवळपास १५ ते २० मिनिटे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
अंबाझरी तलाव सांडव्याच्या भागातून मुख्य वाहिन्या गेल्या असल्याने खोदकामादरम्यान खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. यामुळे शासकीय विभागांनी समन्वयातून काम करावे, अशी महावितरणची भूमिका आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.