Raver constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या रक्षा खडसे यांची हॅटट्रिक महा विकास आघाडीचे श्रीराम पाटील राखतील का, हा प्रश्न विचारला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाच व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश रावेर मध्ये होतो. 10 वर्षापासून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे विद्यमान खासदार आहेत. यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात आहे. लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिरीष चौधरी हे एकमेव आमदार आहेत. महायुतीकडे ग्राम पंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे रावेर मतदारसंघावर कायमच भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘तुतारी’ की ‘कमळ’ कोण बाजी मारणार…? याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.
महाविकास आघाडीकडून यंदा प्रथमच श्रीराम पाटील या उद्योजकाला उमेदवारी दिली आहे. श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार असले तरी त्यांचा संपर्क मतदारसंघात नक्कीच आहे. त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिले असल्याचे मतदार संघात सांगितले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीराम पाटील यांना शरद पवार यांनी लोकसभेचे तिकीट देऊन आपल्याकडे खेचून आणले. त्यामुळे सतत पक्ष बदलाचा फटका त्यांना बसू शकतो का? हेही पाहणे औचित्याचे ठरणार आहे. त्याचे भांडवल मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून होताना दिसून येत आहे.
Dhangekar Protest : काँग्रेस उमेदवार धंगेकर यांचा पोलिस चौकीत ठिय्या
खडसेंनी काढला मार्ग
विकास कामे व संपर्क या मुद्यावर खासदार खडसे यांना प्रचारात त्रास झाला. मात्र त्यांनी अडचणींवर मात करून प्रचाराला वेग दिला. त्यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभा , नरेंद्र मोदी यांची विकासकामे , तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यावर प्रचारात दिलेला भर, सासरे एकनाथ खडसे यांनी प्रचारात घेतलेला सक्रिय सहभाग या बाबी जमेच्या ठरल्या.
नवखे पण समाजाचे पाठबळ
आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राजकारण व समाजकारणात नवीन आहेत. मात्र,मतदारसंघातील बहुसंख्याक मराठा समाजाचे त्यांना मोठे पाठबळ मिळाले. याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसची पारंपरिक मते त्यांच्यासाठी बोनस ठरला. नवखे असूनही त्यांनी बऱ्यापैकी प्रचार करीत आपले आव्हान उभे केले. विदर्भा प्रमाणे मुस्लिम व बुद्ध समाजाची मते त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास ही लढत खडसे यांच्यासाठी सोपी ठरणार नाही.यामुळे यंदाची लढत रक्षा खडसे यांच्यासाठी सोपी नक्कीच नाही.
खडसे यांची कन्या ॲड.रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे म्हणजेच श्रीराम पाटील यांच्या प्रचार कार्यात सक्रीय सहभागी झाल्या. एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. स्थानिक भाजपच्या नेत्यांनी मात्र खडसे यांच्या प्रवेशाकडे पाठ फिरवली परंतु उघड कोणीही बोलत नसल्याचे चित्र भाजपच्या गोटात दिसून येत आहे. भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीष महाजन यांचे जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून वर्चस्व राहिलेले आहे.
मतदारांचे लक्ष
खान्देशातील लोकप्रिय नेते हरिभाऊ जावळे यांनी 2007 आणि 2009 या दोन लढतीत सलग विजय मिळविला. मात्र त्यांचे तिकीट कापून नवख्या रक्षा खडसे यांना 2014 मध्ये संधी देण्यात आली. मोदी लाटेत त्या साडेसहा लाखांवर (6,55,386) मतदान घेऊन विजयी झाल्या.काँग्रेसचे उल्हास पाटील यांना जेमतेम 3 लाख 11 हजार पर्यंत मजल मारता आली. यंदा खासदार आपली हॅट्ट्रिक करतात की पाटील त्यांना पराभूत करण्याचा चमत्कार करतात का याकडे 18 लाख 21 हजार 750 मतदारांचे लक्ष लागले आहे.