Aam Aadmi Party : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली. बाहेर पडताच त्यांनी भाजपवर हल्ला सुरू केला आहे. आम आदमी पार्टी संपवण्याचा मोदी यांचा डाव आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, मी तुरुंगातून बाहेर पडल्यावर कुटुंबाबरोबर हनुमानजी, शिवजी आणि शनी महाराजांची पूजा करून आलो. हनुमानजींची विशेष कृपा आपल्यावर असल्याचे ते म्हणाले.
मोदींवर हल्लाबोल..
आम आदमी पार्टी दोन राज्यांत असलेला छोटा पक्ष आहे. हा पक्ष चिरडून टाकण्याची कुठलीही कसर पंतप्रधान मोदींनी सोडलेली नाही. कोणत्याही मोठ्या पक्षांच्या चार मुख्य नेत्यांना तुरुंगात पाठविले म्हणजे तो पक्ष संपण्याच्या स्थितीत येतो. याच प्रकारची खेळी आमच्याबरोबर खेळण्यात आली. आमच्या पक्षातील चार प्रमुख नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. पण आम आदमी पार्टी हा एक पक्ष नसून एक कल्पना आहे. ही कल्पना संपविण्याचा जितका जास्त प्रयत्न तुम्ही कराल तितकीच ती वाढत जाणार. आगामी काळात आम आदमी पक्ष देशाला भविष्य देणार. परंतु, आज त्यांना आम आदमी पार्टीला संपवायचे आहे, असे केजरीवाल म्हणाले.
मुरली मनोहर जोशी, वसुंधरा राजे, खट्टर, अडवाणी, सुमित्रा महाजन, शिवराज सिंह, रमण सिंह यांचे राजकारण पंतप्रधान मोदींनी संपवले आहे,असेही केजरीवाल म्हणाले. आता योगी आदित्यनाथ यांची बारी आहे. मोदीजी निवडणूक जिंकले तर 2 महिन्यांच्या आत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बदलतील. ही हुकूमशाहीच तर आहे. एक राष्ट्र-एक नेता, देशात एकच हुकूमशाह असावा, अशी त्यांची इच्छा आहे असे केजरीवाल म्हणाले.