Congress News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण सत्ता केंद्रित राहिले आहे. सेवेवर आधारित नाही. त्यांना देशातील आदिवासी, शेतकरी, पीडित महिला यांच्या वेदनांची जाणीव नाही. त्यांची करनी आणि कथनीमध्ये अंतर आहे. त्यामुळे भविष्यात कसे सरकार पाहिजे याचा जाणीवपूर्वक विचार करून मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले. मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावर त्यांनी जोरदार हल्ला केला.
नंदुरबार येथे शनिवारी झालेल्या न्याय संकल्प सभेला त्या संबोधित करीत होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रमेश चेन्नीथला आणि अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
महात्मा गांधींनी काँग्रेसची परंपरा घालून दिली. सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले असे सांगून प्रियंका गांधी म्हणाल्या, लोकशाहीत जनता सर्वोपरी असते पण भाजपची विचारधारा वेगळी आहे. ती आदिवासी संस्कृतीचा आदर करीत नाही. देशात आदिवासींवर अत्याचार झाले पण मोदी आणि त्यांचे मंत्री चूप राहिले. मणिपूर मध्ये महिलेवर अत्याचार झाला तेव्हाही पंतप्रधान चूप राहिले. पंतप्रधान म्हणून त्यांची जबाबदारी नव्हती का असा प्रश्न प्रियंका गांधींनी उपस्थित केला.
जमिनी उद्योगपतींना दिल्या
देशातील आदिवासी येथील मूळ रहिवासी आहेत परंतु त्यांना जमिनी दिल्या नाहीत तर मोदींनी उद्योगपतींना जमिनी दिल्या. खरबपती मित्रांची सोय पाहिली. हेमंत सोरेन आदिवासी मुख्यमंत्री आहेत त्यांना मोदी सरकारने कारागृहात टाकले. भाजप, रा. स्व. संघाने आदिवासी संस्कृतीवर हल्ला करण्याचे काम केले असा आरोप केला.
आदिवासींचा सन्मान नाही
संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे होते परंतु पंतप्रधानांनी त्यांना दूर ठेवले. इतकेच नाही तर ज्या शबरीचा मोदी जयजयकार करतात, त्या शबरीच्या कुळातील राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पाचारण केले जात नाही. इथेही करनी आणि कथनीत अंतर दिसते.
हजारो शबरींचा अपमान होऊन ते चूप राहिले
मोदीजींनी काल स्वतःला शबरीचा पुजारी संबोधले असे सांगून प्रियंका गांधी म्हणाल्या, हाथरस, उन्नाव ची महिला जाळली गेली, महिला खेळाडू न्यायासाठी रस्त्यावर आल्या पण मोदी काहीच बोलले नाहीत. उलट अत्याचार करणाऱ्यांच्या मुलांना तिकीटे दिली. यांच्या कडून न्यायाची अपेक्षा व्यर्थ आहे.
अश्रु कसले काढता
तुम्ही एकाकी कसे. तुम्ही तर जगातील ताकदवान नेते आहात असे असताना मतांसाठी आसवे गाळता हा कमकुवतपणा आहे. हिंमत ठेवा. इंदिरा गांधींकडून शिका. ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. नेहरु जी, डॉ. मनमोहन सिंग, वाजपेयीजी यांनी पंतप्रधान पदाची गरीमा सांभाळली पण मोदी यांनी घालवल्याची टीका केली.
10 वर्षात काय केले
मोदी सरकारने 10 वर्षात काय केले असा सवाल करून त्या म्हणाल्या, महागाई मुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे. मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, शेती साठी कर्ज काढावे लागते. ते मिळत नाही. परंतु उद्योगपतींचे 16 लाख कोटीचे कर्ज माफ केले. सामान्य माणसाला न्याय नाही.
ऊस उत्पादकांना डावलले
ऊस उत्पादकांना द्यायला सरकारी तिजोरीत 16 हजार कोटी नव्हते पण त्या काळात मोदींनी स्वत: साठी तेवढ्याच रकमेची दोन विमान खरेदी केली तेव्हा कोठून आला पैसा असे प्रियंका गांधींनी विचारले.
सरकारे विकत घेतली
पैसे खाऊ घालून आमदार विकत घेतल्याचा आरोप केला. लोकशाही विरोधी कृती आहे पण देशाची मीडिया म्हणते मोदी है तो मुलकी है. 100 कोटी वाटून जनतेने निवडलेले सरकार पाडता. जनतेने यांना धडा शिकवला पाहिजे.
कसे सरकार हवे, निर्णय घ्या
13 मे रोजी नंदुरबारला मतदान आहे तेव्हा सेवेसाठी समर्पित की स्वतःचा विचार करणारे, तसेच देशाची लोकशाही, संविधान ज्यांच्या हाती सुरक्षित आहे त्यांना मतदान करायचे याचा विचार करा. देशाची लोकशाही पुनर्स्थापित करण्याची संधी मिळाली आहे तिचा उपयोग विवेक जागा ठेवून करा असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. हजारोंच्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित होते.