Illegal Buainess : अनेक भागात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने अखेर आमदारानेच अवैध धंद्यांवर धाड टाकली. त्यातून गैरप्रकार उघडकीस आणल्याची घटना यवतमाळातील वणी येथे घडली आहे. भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अवैध धंद्यांवर धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे.
संपूर्ण राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्याची वेगळी ओळख आहे. ‘ब्लॅक डायमंड सिटी’ म्हणून वणीची ओळख आहे. मात्र याच तालुक्यात सध्या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना उत आला आहे. पोलिसांकडूनही यावर अंकुश राहिला नसल्याचा आरोप आहे. वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. अवैध धंद्यांत मटका, जुगार हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी वणी पोलिस आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती देऊनही पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बोदकुरवार यांनी केला. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः मटका अड्ड्यावर धाड टाकून पोलखोल केली आहे.
मजूर टार्गेट
कोळशाच्या खाणीत दिवसभर मजुरी केल्यानंतर मजूर मटका, जुगार खेळून पैसे हरतात. या प्रकारामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीलाही उत आला आहे. असे असताना हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. पोलिस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. त्यामुळे आतातरी मटका ,जुगार सारखे अवैध धंदे बंद होणार का? असा आमदाराने उपस्थित केला आहे.
अशी टाकली धाड!
वणी तालुक्यातील अनेक भागात मटका, जुगार, सट्टा, आदी अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. परिणामी यातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. अशाच एका जुगार अड्ड्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः धाड टाकली. त्यातून अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालावे. जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
वणी तालुक्यात परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. अलिकडेच जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी धाड टाकली होती. हे प्रकरण ताजे असताना जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आता आमदार याविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.