Save Pune : आपल्या नियोजन शून्य गोष्टींमुळे शहरे उद्ध्वस्त होत आहेत.पूणेही त्या मार्गावर आहे. पुण्यात शिक्षण आणि नोकऱ्या उपलब्ध आहेत. तरी आपल्याकडची मुले परदेशी का जाताहेत? त्यांच्या सभोवताली आनंद नाही म्हणून ते देश सोडून चालले आहेत. घाणेरड्या वातावरणात ते राहू शकत नाही. घाणेरडे वातावरण बाहेर ढकलत आहे. मी कित्येक वर्ष पुणे शहरात येऊन सांगायचो, की मुंबई शहर बरबाद व्हायला एक काळ गेला, पण पुणे शहराची वाट लागायला वेळ लागणार नाही.” त्यामुळे लगेच सावध व्हा, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यातील समस्यांवर ते बोलत होते.
शहराच्या लोकसंख्येनुसार रस्ते नाहीत
“आता मेट्रो सुरु झाली. पण, मी सांगितलं होत की, एक सुरु करून बघा पुणेकर जातायेत का? पुणेकरांची काय परिस्थिती आहे टू व्हीलर घेतली आणि गेला पुढे. शहराच्या लोकसंख्येप्रमाणे 15 टक्के रस्ते लागतात. तेवढे पुण्यात नाहीत. लोक शिक्षणासाठी, उद्योगासाठी आले आहेत. पुण्यात विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, कंपन्या, उद्योगधंदे आहेत. पण नियोजन शून्यतेमुळे शहर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
सुंदर शहर हरवले कुठे
शहराचा विकास कसा करावा पुणे महापालिकेला माहीत नाही का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. केंद्राकडून पैसे येतात परंतु काय चाललंय. शहराचे नियोजन आज नाही झाले तर शहर बकाल होईल. शहराचे नियोजन उत्तम होऊ नये. म्हणून राजकीय नेते तुम्हाला जातीपातीत गुंतवून ठेवत आहेत. एखादा माणूस जातीचा आधार घेतो आणि निवडणूक लढवतो. एक काळ पूणे काय सुंदर होत. आता नियोजन शून्य शहर होत चाललंय.” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
पुण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल
पूणे शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करून विस्कटलेली घडी नीट करावी लागेल. कारण आम्ही आता जागे नाही झालो तर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. सर्वांचे योगदान त्यासाठी लागणार आहे असेही राज ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी एका ज्वलंत विषयाला स्पर्श केला आहे.