Bjp vs Ncp : शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का, याविषयी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे आत्मचरित्र वाचले. तसेच त्यांचे राजकारण तडजोडीचे आणि सत्तेच्या स्वार्थाचे राहिले आहे. त्यामुळे ते काय खेळी खेळतील सांगता येत नाही. विलीनीकरण विषयावर ते मत व्यक्त करीत होते.
सोनिया गांधींवर टिप्पणी करताना त्यांनी 15 मे 1999 रोजी त्यांच्या विदेशी मुळावरुन टीका केली होती. त्यानंतर संगमा आणि पवारांनी पक्ष काढला.
काही महिन्यानंतर ते काँग्रेस सोबत गेले. प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, सोनिया गांधी पवारांवर विश्वास ठेवत नव्हत्या.
आज पवारांना हे म्हणायची गरज का पडली असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, त्यांना राष्ट्रवादीच्या भवितव्याची कल्पना आहे. राष्ट्रवादीचा आधार असलेले अजित पवार आज त्यांच्यासोबत नाहीत.
बारामतीच्या निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना खूप दुखावलं. प्रचाराचा स्तर खाली गेला. त्यामुळे अजित पवार परत जाणार नाहीत.
आताची शिवसेना उद्धव ठाकरेंची
आताची शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे शिवसैनिकांची नाही. जसे आताची राष्ट्रवादी पवारांच्या नावाने आहे. इतिहासात कधी नावाने पक्ष नव्हते, हे पक्ष त्यांच्या नावाचे झालेत कार्यकर्त्यांचे राहिले नाहीत, असे मुनगंटीवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
राजकारणात समविचारी पक्ष असले तरी त्यांचे विलीनीकरण होत नाही. त्यामुळे आज जो विलिनीकरणाचा विषय आला, तो भवितव्याच्या अनुषंगाने आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. या निवडणुकीनंतर राज्यातील 2 पक्ष संपतील, याचा आजच्या पवारांच्या विधानाशी संदर्भ आहे. अशा प्रकारचे मत मांडून वातावरण बदलवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.
आम्हाला 2014 ला बहुमत नव्हतं, तेव्हा यांनी न मागता पाठिंबा दिला. भाजपसोबत जाण्याचा निर्णय तेव्हा कुणी घेतला होता. त्यामुळे ते काय निर्णय घेतील सांगता येत नाही. धक्कातंत्राचा तो भाग असतो.
राजकारण किती विचित्र असते पाहा असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, पवारांनी आपल्या भावाचा पराभव केला होता. आणि आज एक भाऊ आपल्या बहिणीचा पराभव करेल. एक वर्तुळ अशा प्रकारे पूर्ण होणार आहे.