OBC Problem : चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आणि मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहा करिता लागणाऱ्या जागे संदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एल्गार पुकारला. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना घेराव घातला.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या द्वारे दोन दिवसात आराखडा तयार करून मंजूरी करीता शासन दरबारी पाठविण्यात येईल असे आश्वासन मिळल्यावरच घेराव मागे घेतला.मिळालेल्या आश्वासनानुसार प्रस्ताव पाठविण्यात आले नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा या वेळी शिंदे समर्थित आमदार भोंडेकर यांनी दिला आहे.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्यास मंजूरी देण्यात आली होती. ज्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन जागा उपलब्ध करून प्रस्ताव पाठवणे बंधनकारक होते. परंतु मंजुरीला चार वर्षे लोटून सुद्धा जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. जागा उपलब्ध करून दिली नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि जवळपास 50 कार्यकर्त्यांसह भंडारा जिल्हा परिषदेवर धावा बोलला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांना घेराव घातला. मागणी पूर्ण झाल्याशिवाय घेराव मागे घेणार नाही असा पावित्रा घेतला.
वसतिगृहाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश
रणदिवे यांनी घेरावाची माहिती जिल्हाधिकारी कुंभेजकर यांना दिली. त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून वसतिगृहाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांत आराखडा आणि प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठविण्याची हमी भोंडेकर यांना दिली.या आश्वासना नंतर भोंडेकर यांनी घेराव मागे घेतला. दोन दिवसात प्रस्ताव सादर झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा दिला. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन जवाबदार राहणार असल्याची चेतावणी दिली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर अध्यक्ष मनोज साकुरे, अनुसूचित जाती जिल्हा प्रमुख संजय नगदेवे, युवा सेना शहर प्रमुख किशोर नेवारे, शहर संघटक नितीन धकाते, राजू देसाई, निटेश मोंघरे, मंगेश मुरकुटे, नितीन पराते, बाबा तांडेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Local Issue : लोकसभेचे मतदान होताच शिवसेना ठाकरे गट पुन्हा आक्रमक!
‘द लोकहित’ शी बोलताना भोंडेकर म्हणाले, मागील चार वर्षापासून जिल्हा प्रशासन झोपेत असल्याने त्यांनी वसतिगृहा करीता जागा उपलब्ध करून दिली नाही. शेवटी या मागणी करीता जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचा घेराव करावा लागला. ज्यामुळे त्यांनी दोन दिवसात जागा उपलब्ध करून देऊन प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्रस्ताव शासन दरबारी पोहोचताच ते जातीने याकडे लक्ष देतील आणि येत्या जून महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या वासतिगृहांना शासनाकडून मंजूरी मिळवून देतील. सोबतच या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तगादा लावून लवकरात लवकर निधी सुद्धा खेचून आणू अशी माहिती भोंडेकर यांनी दिली.