Mitkari Vs Awhad : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत झाली. बारामतीतील राजकारण तापलं असून यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या वादात अजित पवार यांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेत. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला. यावर आमदार मिटकरींनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, आव्हाडांनी जाणीवपूर्वक पक्षाची आणि दत्ता भरणे यांची बदनामी केली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील अजित पवारांच्या निवासस्थानी अजित पवार आणि त्यांच्या आईच्या घेतलेल्या भेटीवरही आमदार अमोल मिटकरींनी टीका केली आहे. हा सुप्रिया सुळे यांच्या भावनिक राजकारणाचा भाग असल्याचे ते म्हटले आहे.
Maharashtra Lok Sabha Election : पवारांच्या भांडणात आमदार मिटकरींची उडी
मागील दोन महिन्यांत या भागात प्रचाराला आलेल्या असताना सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या आईची भेट का घ्यावी वाटली नाही?, हा सवाल यावेळी मिटकरींनी सुळेंना केला आहे. दरम्यान, या भेटीचा सेल्फी न काढून सुप्रियाताईंनी बरं केलं?, असा उपरोधिक टोलाही मिटकरींनी सुळेंना लगावला आहे.
मिटकरींची आव्हाड यांच्यावरही टीका
आमदार अमोल मिटकरींनी आव्हाडांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. आव्हाडांनी जाणिवपूर्वक पक्षाची आणि दत्ता भरणे यांची बदनामी होईल, असा एक व्हिडिओ ट्वीट केला. दरम्यान, कालपासून बारामतीमध्ये बालिश बुद्धीचा भरणा जास्त असल्याने काहीही होऊ शकते. वातावरण बिघडवण्याचे काम केल्या जाऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन मिटकरींनी केले आहे.