Amrut Mahotsav Fund : मोहाडी नगर पंचायत मध्ये 5 लाखाचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा निधी अधिकाऱ्यांनी आपल्या खिशात घातला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगोदर लोकवर्गणीतून साजरा करण्यात आला. काही दिवसांनी यासाठी पाच लाखांचा निधी आला. हा निधी परत न करता बोगस बिले सादर करून पाच लाख रुपये हडप करण्यात आल्याची शंका आहे. याची चौकशी करून घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी जि. प. भंडारा यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.
शासनातर्फे पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त
मोहाडी येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सन 2022-23 मध्ये लेखाशीर्ष 2205 अंतर्गत शासनातर्फे पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकवर्गणीतून अगोदरच साजरा करण्यात आला होता. त्यामुळे प्राप्त निधी शासनाच्या खात्यात परत पाठवायला हवा होता. परंतु निधी परत न पाठवता खोटी बिल तयार करून पाच लाख रुपये हडप करण्यात आले. ही बाब लक्षात येताच पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती, उपसभापती व सदस्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना या निधीबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
Natural Calamity : चंद्रपूर जिल्ह्याला पुराच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवा
संगनमत करून हा निधी हडप
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा निधी हडप केला. त्याची खोटी बिले शासनाला सादर केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र सभापती वासनिक यांनी विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना पाठविले आहे.त्यामुळे आता या प्रकरणात अधिक क़ाय गुपिते बाहेर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.