Eknath khadse : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकला होता. आता त्यांना भाजपात यायचे पण श्रेष्ठीकडून हिरवा कंदील मिळाला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. आता जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितं लक्षात घेऊन खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र अद्यापही प्रवेश दिलेला नाही. रावेरमध्ये खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलीय. दरम्यान, खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त अजून ठरलेला नसल्याचं समजते.
चौथ्या टप्प्यातील मतदानास एक आठवडाच बाकी असूनही अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अलीकडेच खडसेंच्या होमटाऊन म्हणजेच मुक्ताईनगरात येऊन गेले; पण त्यांनी खडसेंची भेट टाळली.
दुसरीकडे शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी, खडसेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच भाजपचे काम करावे. या शब्दांत खडसेंवर टीकास्त्र डागले आहे. एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत.त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही. असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. या घडामोडी खडसेंच्या भाजप प्रवेशासाठी त्या पक्षाचे राज्यातील नेते सहमत नाहीत असे आतापर्यंतच्या घडामोडीतून समोर आले आहे.
Maharashtra Lok Sabha Election : दादा, राणे, शिंदे, सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला
प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते गोंधळात !
कधी काळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी आपण पुन्हा स्वगृही जाणार असल्याची घोषणा केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक प्रचार सुरु आहे. या सर्व परिस्थितीत एकनाथ खडसे राष्ट्रवादी कार्यालयात जाण्याऐवजी भाजप कार्यालयात बसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.